Home बातम्या दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस उत्साहात

दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस उत्साहात

0

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

धर्मशाळा येथे वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रम

तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस हिमाचलमधील धर्मशाळा येथे साजरा करण्यात आला. धर्मशाळेसह देशाच्या विविध भागात दलाई लामा यांच्या सन्मानार्थ प्रार्थना सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. धर्मशाळेतील त्सुगलागखांग मंदिर संकुलात हजारो भाविक, तिबेटी समुदायाचे लोक, बौद्ध भिक्षू आणि आंतरराष्ट्रीय अनुयायी जमले. समारंभात तिबेटी संगीत, नृत्य आणि पारंपारिक उपासना आयोजित करण्यात आली होती.
धर्मशाळेतील मॅकलिओडगंज येथील चुगलखांग बौद्ध मठात दलाई लामा यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, केंद्रीय मंत्री राजीव रंजन, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि इतर उपस्थित होते.

मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने, मी परमपूज्य दलाई लामा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ते प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे प्रतीक आहेत असे म्हटले आहे.
दलाई लामा यांचे खरे नाव ल्हामो धोंडुप होते, जे नंतर तेन्झिन ग्यात्सो म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म 6 जुलै 1935 रोजी तिबेटमधील तक्सर गावात (अम्दो प्रदेश) झाला. 1939 मध्ये त्यांना तिबेटची राजधानी ल्हासा येथे आणण्यात आले आणि 22 फेब्रुवारी 1940 रोजी पारंपारिक धार्मिक आणि राजकीय विधींसह त्यांना तिबेटचे सर्वोच्च नेते घोषित करण्यात आले. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी त्यांनी बौद्ध तत्वज्ञान, तंत्र, संस्कृत, तर्कशास्त्र आणि इतर धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला.

1959 मध्ये भारतात
1950 मध्ये जेव्हा चीनने तिबेटवर हल्ला केला तेव्हा दलाई लामा यांना वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राजकीय जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यानंतर, मार्च 1959 मध्ये जेव्हा तिबेटमधील राष्ट्रीय उठाव क्रूरपणे दडपण्यात आला, तेव्हा दलाई लामांना 80 हजारांहून अधिक तिबेटी निर्वासितांसह भारतात यावे लागले. भारत सरकारने त्यांना धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे आश्रय दिला, जिथून त्यांनी निर्वासित तिबेटी सरकार स्थापन केले. तेव्हापासून, दलाई लामा भारतात राहतात, ते त्यांचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक घर मानतात आणि जगभरात शांती, करुणा, सहिष्णुता आणि वैश्विक मानवतेचा संदेश पसरवत आहेत.
1989 मध्ये नोबेल पुरस्कार
दलाई लामा यांना जगभरात शांती, अहिंसा आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यांना 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उत्तराधिकारी नेमण्याचा
अधिकार नाही ः चीन

दलाई लामा यांच्या पुनर्जन्म आणि उत्तराधिकार यावरील विधानावर चीनचे भारतातील राजदूत शु फेईहोंग यांनी प्रतिक्रिया देताना तिबेटी बौद्ध धर्मात 700 वर्षांपासून जिवंत बुद्धांच्या पुनर्जन्माची परंपरा आहे. ही परंपरा चालू ठेवण्याचा,संपवण्याचा निर्णय केवळ 14 वे दलाई लामा यांच्या हातात नाही. तसेच आपला उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकारही दलाई लामा यांना नसल्याचे म्हटले आहे.