पक्ष केंद्रीय निवडणूक समिती स्थापन करणार
भाजप लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करणार असून त्यासाठी 6 नावांवर विचार सुरू आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे हे देखील शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाच्या सूत्रांनुसार, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी तीन मुख्य गोष्टी लक्षात घेणार आहे. त्यात संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक संतुलन, जातीय समीकरण यांचा समावेश असून पक्षाकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी एक केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली जाणार आहे. जर निवडणुकीची आवश्यकता भासली तर ही समिती नामांकन, छाननी आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करेल.
जे.पी. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला असून ते केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील आहेत, त्यामुळे भाजप लवकरच नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी करत आहे. 2019 मध्ये जेपी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आणि जानेवारी 2020 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
26 प्रदेशाध्यक्षांची निवड
पक्षाच्या घटनेनुसार, 50% राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाते. सध्या भाजपकडे 37 मान्यताप्राप्त राज्य युनिट आहेत. यापैकी 26 राज्यांमध्ये अध्यक्षांची निवड झाली आहे. जुलैच्या पहिल्या 2 दिवसांत भाजपने 9 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षाने हिमाचल, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, दमण दीव आणि लडाख या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे.
पक्षाच्या नियमांनुसार, भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. एखादी व्यक्ती दोनपेक्षा जास्त वेळा पक्षाध्यक्ष होऊ शकत नाही.