Home Featured कळंगुटमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार, दोन युवकांना अटक

कळंगुटमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार, दोन युवकांना अटक

0

आगशी परिसरातील दोन अल्पवयीन मुलींंवर कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन युवकांना आगशी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ मेहबूब मुजावर (19 वर्षे, आल्त पर्वरी, मूळ- हुबळी) आणि ओम विनय नाईक (21 वर्षे, हाउसिंग बोर्ड पर्वरी) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. आगशी पोलीस स्थानकावर 8 जून 2025 रोजी अल्पवयीन मुली बेपत्ताप्रकरणी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. एका तक्रारदाराच्या दोन अल्पवयीन मुली (वय 15 व 13 वर्षे) आणि दुसऱ्या तक्रारदाराची 11 वर्षांची मुलगी 7 जूनपासून बेपत्ता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. आगशी पोलिसांनी या दोन्ही तक्रारीच्या तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त करून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कळंगुटमधील एका हॉटेलमधून तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात यश मिळविले.

हॉटेलमध्ये त्या मुलींच्यासमवेत असलेल्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तीनही मुलींची जबानी नोंदवून घेण्यात आली. त्यात तीनपैकी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले.

त्यानंतर या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेचे कलम 137 (2), 64(1), 74, 75(1), गोवा बाल हक्क कायदा 2005 चे कलम 8(2) आणि पोक्सो कायद्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पणजीचे उपअधीक्षक सुदेश नाईक, पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका परवार व पोलीस ऋषिकेश रायकर तपास करत आहेत.

हॉटेल मालकास अटक
सदर हॉटेल मालक आणि अन्य एकाच्या विरोधात कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हॉटेल मालक रजत चौहान (31 वर्ष) याला अटक केली आहे. या प्रकरणात आगशी पोलिसांकडून कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी संबंधित हॉटेल सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज केला जाणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.