महाराष्ट्रातील दोन संशयितांना अटक
गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेने धुळेर – म्हापसा येथे महाराष्ट्रातील एका कारची झडती घेतली असताना डिकीमध्ये अंदाजे 30 लाख रुपयांचा 30 किलो गांजा आढळून आला आहे. या प्रकरणी धुळे महाराष्ट्र येथील सुखदेव भगवान कोळी (21) आणि रवींंद्र विठ्ठल भील (24) या दोघांना अटक केली आहे. तसेच, संशयितांनी वापरलेली मारुती सियाझ कार आणि मोबाईल मिळून एकूण 40.10 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला
आहे.
धुळेर – म्हापसा येथील एका पेट्रोल पंपाजवळ गांजाची तस्करीसाठी दोन व्यक्ती कार घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हा शाखेच्या एका अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक काल 11 जूनला पहाटेच्या धुळेर म्हापसा येथे तैनात करण्यात आले होते. या पोलीस पथकामध्ये साहाय्यक उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर, दिनेश पिकुळकर, शिपाई सुलेश नाईक, क्रितेश किनाळकर, सुभा गावकर, प्रकाश उत्तेकुरी यांचा समावेश होता. गुन्हा विभागाच्या पोलीस पथकाने धुळेर म्हापसा येथे एमएच 05 बीएम 2020 या कारमधील व्यक्तीची चौकशी केली. त्यानंतर पथकाने कारची झडती घेतली. त्यावेळी कारच्या डिकीत सुमारे 30 किलो गांजा आढळून आला. त्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेत गांजा जप्त केला. याशिवाय संशयिताने वापरलेली कार आणि मोबाईल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 40.10 लाख रुपये आहे. या प्रकरणी संशयितांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.