खाजन शेती संवर्धनासाठी 500 कोटी द्या

0
7

>> खासदार सदानंद शेट तानावडेंची केंद्र सरकारकडे मागणी; अधिवेशनातही मांडला होता प्रश्न

गोव्यातील खाजन शेतीचे संवर्धन होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी गोवा सरकारला केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आपण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत त्यासंबंधीचा प्रश्न मांडताना केल्याची माहिती राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.
खाजन शेतीसाठीचे बांध बांधणे, स्लुइस गेट उभारणे आदीसाठी हा निधी आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात आमच्या पूर्वजांनी स्वत: हे काम करून खाजन शेतीला सुगीचे दिवस आणले होते, असे तानावडे म्हणाले. गोवा सरकारला यासंबंधीचा एक सविस्तर प्रस्ताव तयार करून त्यासाठी नेमका किती निधी लागेल, तोही सदर प्रस्तावात नमूद करून केंद्राकडे पाठवण्यास आपण सांगितले असल्याची माहिती तानावडे यांनी दिली.

राज्यसभा खासदार म्हणून नुकतेच आपले एक वर्ष पूर्ण झाले असून, वर्षभराच्या काळात आपण गोव्यासह देशभरातील प्रश्नही राज्यसभेत मांडले; पण 90 टक्के प्रश्न हे गोव्यशी संबंधित होते, अशी माहिती त्यांनी दिली.
गोवा-एर्नाकुलम रेल्वे गाडीला थिवी येथे थांबा देण्याची मागणी आपण केली असून, पुणे व अन्य भागांत शिक्षण घेणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही मागणी केली असल्याचे तानावडे म्हणाले.

कोकणीसह मराठीतूनही बोलणार
राज्यसभेत कोकणी व मराठी ह्या दोन भाषांतून बोलण्याचे आपण ठरवले होते. कोकणीतून आपण बोललो; मात्र मराठीतून 12 ऑगस्ट रोजी बोलण्याचा बेत होता. मात्र, राज्यसभेचे त्या दिवशीचे कामकाज रद्द झाल्याने मराठीतून बोलायचे राहून गेले. आता आपण हिवाळी अधिवेशनात मराठीतून बोलणार असल्याचे तानावडे म्हणाले.

एसटी राजकीय आरक्षण विधेयक हिवाळी अधिवेशनात संमत होणार
राज्यातील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दाही आपण राज्यसभेत मांडला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी विधेयक संसदेत मांडण्यात आले; मात्र ते हिवाळी अधिवेशनात संमत होणार असल्याचे सदानंद तानावडे म्हणाले. त्यामुळे 2027 च्या गोवा विधानसभा अधिवेशनात राज्यातील एसटी समाजाला गोवा विधानसभेत 10 टक्के एवढे राजकीय आरक्षण मिळू शकणार असल्याचे ते म्हणाले.