>> नामकरणानंतर चार महिन्यांनी जीएमआर कंपनीला सुचले शहाणपण; नागरिकांतून समाधान
मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावापुढे ‘न्यू गोवा’ किंवा ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असा उल्लेख करता येणार नसल्याचे पत्र काही दिवसांपूर्वीच नागरी उड्डाण खात्याचे संचालक सुरेश शानभोग यांनी जीएमआर कंपनीचे सीईओ आर. व्ही. सेशन यांना पाठविले होते. त्या पत्रानंतर खडबडून जागे झालेल्या जीएमआर कंपनीने अखेर राष्ट्रीय महामार्गांवरील विमानतळाच्या नावाचे जुने फलक हटवले असून, आता ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नावाचे फलक सर्वत्र लावले आहेत. जीएमआर कंपनीला चार महिन्यांनी हे शहाणपण सुचले असून, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 डिसेंबरला मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करत त्याचे नामकरण ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे जाहीर केले होते. त्यानंतर 4 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावाला अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली होती; मात्र अधिकृत नामकरणानंतरही जीएमआर कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गावर लावलेल्या विमानतळाच्या नामफलकांवर ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असा उल्लेख करण्यात येत होता. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही कंपनीने दखल घेतली नव्हती. अखेर यासंबंधी स्थानिक युवक ज्ञानेश्वर वरक यांनी ईमेलद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, गोवा राज्य प्राधिकरण मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन अखेर ‘न्यू गोवा’ किंवा ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असा उल्लेख करता येणार नाही. फक्त मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ याच नावाने उल्लेख करावा लागेल, असे पत्र नागरी उड्डाण संचालकांनी कंपनीला पाठवले होते.
जुने फलक हटवले; नवे लावले
नागरी उड्डाण संचालकांच्या पत्रानंतर जीएमआर कंपनीने जुने फलक हटवले असून, ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख असलेले नवे फलक राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र लावण्यात आले आहेत. धारगळपासून मालपे-पेडणे या ठिकाणच्या राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही अधिकृत नावाचा उल्लेख असलेले फलक लावले आहेत.