>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
>> जिल्हाधिकार्यांकडून आदेश जारी
राज्य सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमध्ये येत्या ७ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका संदेशाद्वारे काल दिली. राज्यातील कोरोना महामारीच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचारबंदीवाढीबाबत राज्यातील दोन्ही जिल्हाधिकार्यांकडून आदेश जारी केले गेले आहेत.
राज्यात ९ ते २३ मे दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीमध्ये पहिल्यांदा २४ मे रोजी वाढ करून ती ३१ मे २०२१पर्यत वाढवण्यात आली होती. आता, संचारबंदीमध्ये ७ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत आणखी वाढ करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या नियमांबाबत जिल्हाधिकार्यांकडून आदेश जारी केला जाणार आहे. संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवली जात आहेत. हॉटेलमधील पार्सल सेवेला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील इतर दुकानदारांकडून दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्याची मागणी केली जात आहे. पणजी महानगरपालिकेचे मार्केट संचारबंदीच्या काळात बंद आहे. बरेच विक्रेते सामानाची पदपथावर विक्री करताना दिसत आहेत. मासळीचीसुध्दा पदपथावर विक्री केली जात आहे. काही ठिकाणी वाहनांतून मासळीची विक्री केली जात आहे. पणजीतील मार्केट खुले नसल्याने दुकानांमध्ये नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. पणजी महानगरपालिकेने खुल्या जागेत मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, खुल्या जागेत मार्केट सुरू करणे शक्य झाले नाही.
जिल्हाधिकार्यांकडून
आदेश जारी
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय (आयएएस) आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटयाळ (आयएएस) यांनी राज्यातील संचारबंदीत येत्या ७ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करणारा आदेश काल जारी केला आहे. कोविड निर्बंधित विभागात लागू करण्यात आलेली अतिरिक्त बंधने कायम राहणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.
घटक राज्य दिनानिमित्त
आज सरकारी कार्यक्रम नाही
राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे राज्यात घटक राज्य दिनानिमित्त आज रविवार ३० मे २०२१ रोजी कोणताही सरकारी कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्य सरकारकडून कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक आव्हाने उभी झाली आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन व्हावे ही काळाची गरज बनली आहे. राज्य सरकार आजच्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी पूर्ण सक्षम आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.