Home Featured रायबंदरमध्ये १५ ऑगस्टपूर्वी आरोग्य केंद्र सुरू करणार

रायबंदरमध्ये १५ ऑगस्टपूर्वी आरोग्य केंद्र सुरू करणार

0

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

राज्य सरकारने अखेर रायबंदर येथे सामाजिक आरोग्य केंद्र (सीएचसी) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून हे आरोग्य केंद्र १५ ऑगस्ट २०२१ पूर्वी सुरू केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

रायबंदर येथील जुन्या इस्पितळ इमारतीमध्ये सामाजिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्याची सूचना उच्च शिक्षण संचालनालयाला करण्यात आली आहे. तसेच या आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचार्‍यांची भरती करण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
स्थानिक नागरिकांकडून रायबंदर येथील इस्पितळाच्या जुन्या इमारतीमध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, स्थानिक आमदार यांना यापूर्वी निवेदनेसुद्धा सादर केली आहे. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी रायबंदर येथे आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते.

रायबंदर येथील इस्पितळाच्या जुन्या इमारतीमधील जागा आयुष केंद्रासाठी उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा केल्याने स्थानिकांनी आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला.

रायबंदर येथे आयुष केंद्र सुरू करण्यात येत असल्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आमदार मोन्सेरात आरोग्य केंद्राची मागणी पूर्ण करू शकत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर आमदार मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांशी आरोग्य केंद्राच्या प्रश्‍नावर पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यास भाग पाडले.