Home Featured ४५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराच्या खाली

४५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराच्या खाली

0

>> शनिवारी ९६३ नवे बाधित, २७ जणांचा बळी

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूसत्र कमी होत नाही. मात्र, नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. चोवीस तासांत आणखी २७ रुग्णांचा बळी गेला आहे. तसेच, नव्या ९६३ रुग्णांची नोंद झाली आहे. साधारण दीड महिन्यानंतर नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा कमी आलेली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २२.५२ टक्क्यावर आला आहे.
सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ०५६ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २५९७ एवढी झाली आहे. राज्यातील आणखी १२०६ रुग्ण बरे झाले आहेत. चोवीस तासांत इस्पितळामधून १५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५४ हजार ४१९ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत २७ बळी
राज्यात मे महिन्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. चोवीस तासांत आणखी २७ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १७ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात ७ रुग्ण आणि दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात ३ रुग्णांचा बळी गेला आहे. चार रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता.

शनिवारी नवे ९६३ रुग्ण
राज्यात चोवीस तासांत नवे ९६३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ४२७६ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील २२.५२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट दिलासा देणारी आहे. मात्र, रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणावर अजूनपर्यंत नियंत्रण आलेले नाही.
मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १३०१ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७६४ रुग्ण आणि चिंबलमधील रूग्णसंख्या ७०५ एवढी आहे. कांदोळी, फोंडा, पर्वरी, कासावली, कुठ्ठाळी या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. फोंडा येथे ९५१ रुग्ण, कांदोळी येथे ६७७ रुग्ण, कुठ्ठाळी येथे ५५५ रुग्ण, कासावली येथे ६१८ रुग्ण, वास्को येथे ४२८ रुग्ण, पर्वरी येथे ६४३ रुग्ण, पेडणे येथे ५८७ रुग्ण, शिवोली ४९८ रुग्ण, कुडचडे येथे ५३५ रुग्ण, म्हापसा येथे ४५८ रुग्ण आहेत.

१२०६ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आणखी १२०६ रुग्ण काल बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ७६६ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५७ टक्के आहे. सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ८४७ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.