तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ अर्थात ओएनजीसीच्या विहिरीवर तेल उत्खनन करणारा पी-३०५ हा तराफा बुडाला होता. या तराफ्यावरील ६१ जणांचे मृतदेह नौदलाला शोध मोहिमेदरम्यान मिळाले आहेत. यातील काही मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.
‘पी ३०५’ तराफा समुद्रात बुडून झालेल्या दुर्घटनेतील २६ मृतदेहांची शुक्रवारी रात्रीपर्यंत ओळख पटविण्यात आली होती. त्यातील हे सर्व मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, तर २३ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची ओळख पटविणे अवघड आहे. मृतांचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटविल्यानंतर हे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या तराफ्यासोबतच वरप्रदा ही नौकाही बुडाली असून सध्या खंबातच्या खाडीपर्यंत नौदलाच्या आठ युद्धनौका आणि तटरक्षक दलाच्या ७ जहाजांमार्फत शोधमोहीम सुरू आहे. या नौकेवरील ११ कर्मचारी अद्यापही बेपत्ता असून दोघांना वाचवले आहे. या नौकेने हा तराफा खेचून समुद्रात आणून सोडला. त्यानंतर तेथून काही अंतरावर वरप्रदा नौकाही नांगर टाकून उभी करण्यात आली. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही नौका समुद्राच्या लाटांबरोबर वाहून गेली.