काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. आता लवकरच करोनाच्या उपचारांमध्येही मोठे बदल होणार असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापरही थांबवला जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधे आणि त्यांच्याविषयी प्रोटोकॉल ठरवून देणार्या तज्ज्ञांच्या समितीने अनेक औषधांबद्दल संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. या संशोधनानंतर कोणत्या औषधांचा उपयोग उपचारासाठी करता येईल आणि कोणत्या औषधांचा वापर बंद होईल यावर निर्णय घेण्यात य्ेईल. सर्वात जास्त चर्चा रेमडेसिवीर या इंजेक्शनची आहे. त्याच्यासंदर्भातही संशोधन सुरू आहे. या संशोधनानंतरच रेमडेसिवीरबद्दलचाही निर्णय घेण्यात येईल. जागतिक आरोग्य संघटनेनेही रेमडेसिवीरचा कोरोनावरच्या उपचारांवर फारसा उपयोग होत नसल्याचे सांगत त्याला उपचारातून हद्दपार करण्याची शिफारसही केली होती.
कोरोनावरच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधे आणि त्यांच्याबद्दलचे प्रोटोकॉल ठरवणार्या समितीचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, संशोधनातूनच कोणते औषध कोरोनावर जास्त प्रभावी आहे ते समोर येईल. ज्या औषधांचा प्रभाव कमी आहे, त्यांना उपचारातून कमी करण्यात येईल.