>> नवीन १६४७ बाधित, २६९३ कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३९ रुग्णांचा बळी गेला असून नव्या १६४७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २६९३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २,३४१ एवढी झाली आहे.
सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १८ हजार २४३ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३५.९५ टक्के एवढे झाले आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
चोवीस तासांत ३९ मृत्यू
राज्यात मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. चोवीस तासांत आणखी ३९ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १९ रुग्ण, मडगाव येथील दक्षिण गोवा इस्पितळात १५ रुग्ण, दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात ३ रुग्ण आणि धारबांदोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात २ बळींची नोंद झाली आहे.
दोन्ही डोस घेतलेल्या एका रुग्णाचे निधन
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कांदोळी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी दोन्ही डोस घेतले होते. तर, कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या मळा पणजी येथे ६६ वर्षीय महिला रुग्ण आणि म्हापसा येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.
नवे १६४७ रुग्ण
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ३५ टक्क्यांवर आले आहे. चोवीस तासांत नवे १६४७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ४५८१ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील ३५.९५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार ८३९ एवढी झाली आहे.
राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पणजीमध्ये ९९७ रुग्ण आणि चिंबलमध्ये ९५३ रुग्ण आहे. मडगाव येथील सध्याच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मडगावातील सध्याच्या रुग्णांची संख्या १८४९ एवढी आहे. फोंडा ९२४ रुग्ण, कांदोळी ८१४ रुग्ण, कुठ्ठाळी ७५१, कासावली ८३९, वास्को ६७०, पर्वरी ६९९, पेडणे येथे ६९९ रुग्ण, कुडचडे येथे ६३१ रुग्ण आहेत.
२४ तासांत १९६ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या १९६ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इस्पितळात दाखल करण्यात येणार्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.
२६९३ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना बाधेतून बरे होणार्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित आणखी २६९३ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २४ हजार २५५ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७९ टक्के आहे.
मेच्या २२ दिवसांत
११७३ कोरोना बळी
राज्यात कोरोना महामारीच्या एप्रिल २०२१ पर्यंतच्या काळात एकूण ११६८ बळींची नोंद झाली होती. कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोव्याला जोरदार दणका दिला आहे. कोरोना विषाणू राज्यात पसरू लागल्यानंतर एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ११६८ बळींची नोंद झाली होती. तर मे २०२१ या एकाच महिन्यातील गत २२ दिवसांत ११७३ रुग्णांच्या बळींची नोंद झाली असून एप्रिलपर्यंतच्या एकूण बळींच्या संख्येला मे महिन्यातील बळींनी मागे टाकले आहे.