Home Featured संचारबंदी वाढवण्याबाबत शनिवारी निर्णय

संचारबंदी वाढवण्याबाबत शनिवारी निर्णय

0

>> मुख्यमंत्री घेणार अधिकार्‍यांची बैठक

>> कोरोना महामारीचा आढावा घेणार

राज्यातील संचारबंदीमध्ये आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारी २२ मे रोजी संचारबंदीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेऊन कोरोना महामारीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
राज्यात ९ मे २०२१ रोजी संचारबंदी लागू करण्यात आली असून रविवार २३ मे २०२१ पर्यत संचारबंदी कायम आहे. या संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ यावेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवली जात आहेत.
येत्या शनिवार २२ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस व इतर खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्यातील कोरोना महामारीच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी वाढविण्याच्या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
संचारबंदी वाढण्याची शक्यता
राज्यातील संचारबंदी येत्या ३० मेपर्यंत वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
बुधवारी कोरोनाने ३१ बळी
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३१ रुग्णांचा बळी गेला असून नव्या १२०९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २१६० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २,२२८ एवढी झाली आहे.
सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २२ हजार ९६४ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१.२२ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत इस्पितळामधून १३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवे १२०९ रुग्ण
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. पॉझिटिव्हीटी दर ३१.२२ टक्क्यांवर आला आहे. चोवीस तासांत नवे १२०९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ३८७३ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३९ हजार ९८५ एवढी झाली आहे. आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालात राज्यात विविध भागातील सध्याच्या रुग्णांची आकडेवारी दिली जात नाही. मडगाव, पणजी, कांदोळी, फोंडा, पर्वरी, म्हापसा, कुठ्ठाळी, शिवोली, चिंबल व इतर भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.
२४ तासांत २०९ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या २०९ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे. आत्तापर्यंत २४ हजार ७०३ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले आहेत.
२१६० जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना बाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित आणखी २१६० रुग्ण काल बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ होत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ७९३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ९७६ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.
राज्यातील कोविड केअर सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत. उत्तर गोव्यात एकूण ३५१ खाटा आहेत. त्यातील २३७ खाटा रिक्त आहेत. तर, दक्षिण गोव्यात एकूण २३० खाटा आहेत. त्यातील १३९ खाटा रिक्त आहेत.

चोवीस तासांत ३१ मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. चोवीस तासांत आणखी ३१ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १८ रुग्ण, मडगाव येथील दक्षिण गोवा इस्पितळात १२ रुग्ण, उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात एका बळीची नोंद झाली आहे. ४ कोरोना रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता.