वादळामुळे ३५ कोटींचे नुकसान

    0
    112

    >> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

    राज्यात तौक्ते या चक्रीवादळामुळे सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी डिचोली, बार्देश तालुक्यातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.
    वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून गुरुवारपर्यंत सर्वच भागातील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परराज्यातील कामगारांची मदत घेतली जात आहे. बार्देश तालुक्यातील सुमारे १३५ घरांची हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
    राज्यात चक्रीवादळामुळे घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे राज्यातील हार्डवेअरची दुकाने उघडी ठेवण्यास तत्त्वतः मान्यता देण्याची सूचना करण्यात आली आहे. घरांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य हे हार्डवेअरच्या दुकानांमध्ये मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    शेती बागायतीची ३ कोटींची हानी ः कवळेकर
    तौक्ते या चक्रीवादळामुळे राज्यातील शेती बागायतीचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल दिली.

    शेती बागायतीच्या हानीबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना शेतकी खात्याच्या विभागीय शेतकी अधिकार्‍यांना करण्यात आली होती. शेतकी खात्याच्या अधिकार्‍यांनी शेती बागायतीच्या नुकसानाबाबत अहवाल सादर केला आहे. शेतीचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. गतवर्षी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यानुसार यावर्षीही शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

    प्रत्येकी चार लाखांची मदत
    राज्य सरकारने तौक्ते या चक्रीवादळामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

    मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वादळामुळे बळी गेलेल्या व्यक्तींबाबत दुःख व्यक्त केले आहे. हणजूण येथे माड मोडून पडल्याने शीतल महादेव पाटील या युवतीचे निधन झाले. शीतल हिची आई मालू पाटील हिच्याकडे सरकारी आर्थिक मदतीचा ४ लाख रुपयांचा धनादेश काल सुपूर्द करण्यात आला आहे.

    या चक्रीवादळामुळे राज्यात एकूण तीन जणांचा बळी गेला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहे. माशेल येथे धावत्या दुचाकीवर विजेचा खांब मोडून पडल्याने दुचाकीवरील दोघांचे निधन झाले.