Home बातम्या गोव्यासह कोकणात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता

गोव्यासह कोकणात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता

0

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. या वादळामुळे आज दि. १५ पासून ते १७ मेपर्यंत तीन दिवस गोव्यासह कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १६ आणि १७ तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या वादळाचे नाव तौंते असे आहे.

चक्रीवादळाची रविवारी तीव्रता वाढेल. यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. १५ ते १७ मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. खात्याने रविवारी आणि सोमवारी गोव्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सुरुवातीला हे चक्रीवादळ पुढे जाण्याची शक्यता असून १८ मे रोजी गुजरात किनार्‍यावर धडकेल. या वादळामुळे कोल्हापूर आणि सातार्‍यामध्येही पावसाची शक्यता आहे.

राज्यात जोरदार वारे

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. पुढील १२ तासांत या चक्रीवादळाचा वेग आणखी वाढणार आहे. येत्या १८ मे रोजी गुजरात किनार्‍यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.