गोवा विधानसभेच्या चार दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार २५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होणार असून २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे.
राज्यातील कोळसा, मोले अभयारण्यातील प्रकल्प, लोकायुक्त कायदा दुरुस्ती व इतर प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. या अधिवेशनात ७५१ प्रश्न मांडण्यात येणार आहेत. त्यात तारांकित १९५ आणि अतारांकित ५५६ प्रश्नांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून अनेक विधेयके सादर केली जाणार आहेत. तसेच आमदारांकडून खासगी विधेयके, खासगी ठराव मांडण्यात येणार आहेत.
या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यात माजी सभापती अनंत शेट, माजी उपसभापती सायमन डिसोझा, माजी आमदार बाबन नाईक, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राज्यपाल मृदुला सिन्हा, माजी राज्यपाल मोतीलाल व्होरा, माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग, रामविलास पास्वान, रघुवंश प्रसाद सिंग, पंडित जसराज, एस. पी. बालसुब्रम्हण्य’, स्वातंत्र्यसैनिक गुरूनाथ केळेकर, फुटबॉलपटू दिएगो मारडोना व इतरांचा समावेश आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार मानणारा ठराव आमदार ग्लेन टिकलो मांडणार आहेत. या ठरावाला आमदार दयानंद सोपटे आणि आमदार सुभाष शिरोडकर अनुमोदन देणार आहे.
जमावबंदीचा आदेश
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पर्वरी येथील सचिवालयाच्या ५०० मीटर परिसर आणि पणजी पोलीस स्थानक परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या काळात पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये. मोर्चा, सभा, निदर्शने करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मोर्चा, निदर्शने करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वपरवानगीची सक्ती करण्यात आली आहे.