कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू शकतो हे आजचे जागतिक चित्र समस्त मानवाचे डोळे उघडणारे आहे. तर्हेतर्हेची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि अद्ययावत युद्धसामुग्री वापरणार्या महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला देखील आज या यःकश्चित विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तोंडावर आवरण घालून हिंडावे लागते आहे. एखाद्या वैज्ञानिक पार्श्वभूमीच्या कल्पनारम्य भयपटातल्यासारखी अवघी पृथ्वी आज भयग्रस्त आहे. या संकटातून सोडवू शकेल अशा तारणहाराची प्राण कंठाशी आणून प्रतीक्षा करते आहे. या अंधार्या बोगद्याचा अंत अजून दिसत नाही. आपण यातून बाहेर पडू ही आशेची किरणे आणि विश्वास जरूर आहे, परंतु अजून बोगदा संपताना दिसत नाही अशी ही हतबल परिस्थिती आहे.
भारताने नुकताच कोरोनाबाधितांचा पन्नास लाखांचा आकडा ओलांडला. जगात कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९१ लाखांवर गेलेली आहे आणि ९ लाखांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. जगातील कोरोनाबाधितांमध्ये सर्वांत जास्त संख्या स्वतःला जगातील सर्वांत शक्तिशाली आणि संपन्न देश म्हणवणार्या अमेरिकेत आहे. जगातील एकूण बाधितांच्या निम्मी म्हणजे १ कोटी ४९ लाख रुग्णांची संख्या एकट्या अमेरिका खंडामध्ये आहे. त्या खालोखाल दक्षिण पूर्व आशियाचा समावेश होतो. त्या खाली मग युरोप, मध्यपूर्व देश, आफ्रिका वगैरेंचा समावेश होतो. ज्या चीनमधून ही महामारी जगभरात पसरली, तेथील रुग्णांची एकूण संख्या आहे अवघी नव्वद हजार!
भारतामध्ये पन्नास लाख रुग्णसंख्या होऊनही अद्याप सरकार हे सामाजिक संक्रमण मानायला तयार नाही. ‘क्लस्टर ऑफ केसीस’ असेच या संसर्गाच्या फैलावाचे अधिकृत वर्णन केले गेलेले आहे. गोव्यामध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही. हे सामाजिक संक्रमण आहे हे अजूनही अधिकृतरीत्या मान्य केले गेलेले नाही.
गोव्यासारख्या छोट्या राज्याला खरे तर कोरोनावर योग्य नियंत्रण मिळवता आले असते. राज्याच्या सीमा बंद होत्या, तेव्हा सुरवातीच्या काळात तसे ते मिळवता आले देखील. परंतु सीमा खुल्या होण्यापूर्वीच मांगूरहिलचे प्रकरण घडले आणि बघता बघता कोरोनाच्या फैलावाला तोंड फुटले. आज राज्यामध्ये असे एकही प्रमुख गाव नाही, जेथे कोरोना पोहोचलेला नाही. सीमा खुल्या झाल्यापासून तर हाहाकार चाललेला आहे. आता तर महामारीचे पर्यटन चालले आहे!
एकीकडे रुग्ण वाढत आहेत, मृत्यूचे प्रमाण वाढते आहे, होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या दिवसागणिक तीन – चारशेच्या सरासरीने कमालीची वाढते आहे, परंतु अद्याप राज्याच्या आरोग्य यंत्रणेला कोरोना रुग्णांचे व्यवस्थापनही योग्य प्रकारे करता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारण्यात काहीही अर्थ नाही. चाचण्यांसाठी करावी लागणारी नाचानाची, रुग्णांना योग्य मार्गदर्शनाची असलेली वानवा, नियमित वैद्यकीय तपासण्या व उपचारांचा अभाव हा सगळा जो काही सावळागोंधळ या कोरोनाच्या प्रत्यक्ष अनुभवांतून गेलेल्यांकडून सातत्याने समोर येतो आहे, त्याचा आणि सरकारच्या सज्जतेच्या दाव्याचा ताळमेळ जुळत नाही. उच्चपदस्थांशी वशिला असेल तरच तुमच्याकडे कोणी थोडेफार लक्ष देते अशी एकूण परिस्थिती दिसते. तरीही राज्यातील सत्ताधारी आमदार आणि स्वतः आरोग्य संचालक देखील कोरोनाबाधित होताच खासगी इस्पितळात दाखल होतात तेव्हा सामान्यांनी काय करायचे? गंभीर आजारी असलेल्या सर्वसामान्यांना कोविड इस्पितळांमध्ये खाटा उपलब्ध होत नाहीत. होम आयसोलेशनखालील रुग्णांना कोणीही वाली दिसत नाही, आणि तरीही देशातील सर्वोत्तम सेवा आम्ही देतो आहोत ही जी शेखी सरकार मिरविते आहे, ती कशाच्या जोरावर? कोरोनाच्या महामारीतून मानवाची मुक्तता होण्यास अजून बराच काळ जावा लागेल हे तर एव्हाना स्पष्ट झालेले आहे. कोरोनावर लशी बनवण्याची अहमहमिका जगभरामधील संशोधकांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये लागली आहे. काहींनी प्रत्यक्ष उत्पादन आणि मानवी चाचण्यांना देखील प्रारंभ केलेला आहे, परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या पोहोचायला अद्याप बराच अवधी लागणार आहे. तोवर धीराने आणि संयमाने जनता कोरोना महामारीला सामोरी जात असताना सरकारकडून जर तिला दिलासा आणि भरवसा मिळणार नसेल तर ही प्रदीर्घ लढाई तिने कशी जिंकायची?