ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर मालिका विजय

0
89

>> केरी-मॅक्सवेलची २१२ धावांची भागीदारी

आलेक्स केरी व ग्लेन मॅक्सवेल यांनी सहाव्या गड्यासाठी केलेल्या २१२ धावांच्या विशाल भागीदारीच्या बळावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणत इंग्लंडविरुद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

तिसरा सामना व मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडने ठेवलेले ३०३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४९.४ षटकांत गाठले.
विजयासाठी ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. परंतु, ख्रिस वोक्स याने कर्णधार फिंच याला पायचीत करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. तिसर्‍या स्थानावर उतरलेला मार्कुस स्टोईनिस याने निराश केले. वोक्सचा लेग साईडच्या बाहेर जाणारा चेंडू तटवण्याच्या नादात त्याने मॉर्गनकडे सोपा झेल दिला. यावेळी इंग्लंडची २ बाद ३१ अशी स्थिती झाली. पहिल्या दहा षटकांचा खेळ होताच मॉर्गनने माजी कर्णधार रुट याला गोलंदाजीस उतरवले. रुट याने आपल्या पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवला. चंेंडू अपेक्षेपेक्षा अधिक वळल्याने वॉर्नर याचा ‘कट्’चा प्रयत्न फसला.

रुटने यानंतर कमाल करताना आपल्या पुढच्याच षटकात मिचेल मार्शला यष्टिरक्षक बटलरकरवी झेलबाद केले. यावेळी इंग्लंडची ४ बाद ५५ अशी दयनीय स्थिती झाली. मार्नस लाबुशेन व आलेक्स केरी ही जोडी संघाचा कोसळता डोलारा सावरणार असे वाटत असताना केरी याच्या चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नामुळे लाबुशेनला धावबाद होऊन परतावे लागले. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला त्यावेळी फलकावर केवळ ७३ धावा लागल्या होत्या. यानंतर केरी व मॅक्सवेल ही दुकली संघाच्या मदतीला धावून आली. मॅक्सवेलने आपले दुसरे वनडे शतक लगावताना केवळ ९० चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह १०८ धावा कुटल्या. केरीने आपल्या ३९व्या सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवताना ११४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. डावातील शेवटच्या षटकात दहा धावांची आवश्यकता असताना स्टार्कने रशीदचा पहिलाच चेंडू सीमारेषेबाहेर षटकारासाठी भिरकावत काम सोपे केले. चौथ्या चेंडूवर स्टार्कने ‘बॅकवर्ड स्क्वेअर लेग’ वरून चौकार ठोकत संघाला विजयी केले.

धावफलक
इंग्लंड ः ७ बाद ३०२
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. रुट २४, ऍरोन फिंच पायचीत गो. वोक्स १२, मार्कुस स्टोईनिस झे. मॉर्गन गो. वोक्स ४, मार्नस लाबुशेन धावबाद २०, मिचेल मार्श झे. बटलर गो. रुट २, आलेक्स केरी झे. वूड गो. आर्चर १०६, ग्लेन मॅक्सवेल झे. करन गो. रशीद १०८, पॅट कमिन्स नाबाद ४, मिचेल स्टार्क नाबाद ११, अवांतर १४, एकूण ४९.४ षटकांत ७ बाद ३०५
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स १०-०-४६-२, जोफ्रा आर्चर ९-०-६०-१, मार्क वूड ९-१-४०-०, ज्यो रुट ८-०-४६-२, टॉम करन ६-१-४०-०, आदिल रशीद ७.४-०-६८-१

जोफ्रा आर्चरचा ‘नो बॉल’ इंग्लंडला नडला
जोफ्रा आर्चरने डावातील विसाव्या षटकात टाकलेला ‘नो बॉल’ इंग्लंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरला. या षटकात आर्चरचा एक उसळता चेंडू ‘थर्ड मॅन’ वरून मारण्याच्या नादात केरी याने थर्ड मॅनला असलेल्या आदिल रशीद याच्याकडे सोपा झेल दिला. यावेळी केरी केवळ ९ धावांवर होता. परंतु, पंचांनी ‘नो बॉल’चा इशारा केल्याने इंग्लंडला या यशापासून दूर रहावे लागले.