>> पुढील महिन्यातील डेन्मार्क मास्टर्सही रद्द
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही स्पर्धांना हळूहळू प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत जैव सुरक्षित वातावरणात प्रारंभ झालेला आहे. असे असले तरी या महामारीच्या भीतीने काही स्पर्धा अजूनही स्थगित वा रद्द होताहेत. त्यात आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धेची भर पडली आहे.
पुढील महिन्यात होणारी डेन्मार्कतील आरहस शहरात आयोजित थॉमस व उबेर बॅडमिंटन स्पर्धा स्थगित करण्यात आली असून ती आता पुढच्या वर्षी खेळविण्यात येणार आहे.
थॉमस व उबेर बॅडमिंटन स्पर्धा इंडोनेशियातील आरहास शहरात ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत होणार होती. परंतु वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) ही स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे काल मंगळवारी घोषित केले. १३वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियासहीत कोरिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, तैवान, सिंगापूर आणि हॉंगकॉंगने यापूर्वीच या स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताची स्टार शटलर सायना नेहवाल हिच्यासह बर्याच दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेतील सहभागाबाबत चिंता व्यक्त केली होती. सात मोठ्या देशांनी स्पर्धेतून माघार घेतली असल्याने ही स्पर्धा खेळविण्यात काहीच अर्थ उरणार नसल्याचे सायनाने म्हटले होते.
डेन्मार्कतील दोन स्पर्धा रद्द
दरम्यान, वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने पुढील महिन्यात डेन्मार्कमध्ये आयोजित दोन मोठ्या बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यात १३ ते १८ ऑक्टोबरपर्यंत होणारी डेन्मार्क सुपर ७५० स्पर्धा आणि २० ते २५ ऑक्टोबपर्यंत होणारी डेन्मार्क मास्टर्स बॅडमिंनट स्पर्धेचा समावेश आहे.