जागतिक क्रिकेटला गरज धोनीसारख्या आदर्श खेळाडूची

0
94

>> सबा करीमने व्यक्त केले मत

भारताला दोन विश्वचषके (टी-२० व वनडे) जिंकून देणारा टीम इंडियाचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आता तो केवळ आयपीएलमध्ये खेळणार आहे. असे असले तरी धोनीसारख्या आदर्श क्रिकेटपटूची अजूनही जागतिक क्रिकेटला आवश्यकता असल्याचे मत टीम इंडियाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज सबा करीम याने व्यक्त केले.

सबाच्या मते धोनी हा कडव्या मेहनतीवर भर देणारा खेळाडू असून तो अजूनही एकदम तंदुरुस्त आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असल्याने त्याच्यावरील शारीरिक ताणही बराच कमी झालेला असेल.
धोनीने आयपीएलच्या यशस्वी वाटचालीत आपली मोलाचे असे योगदान दिलेले आहे. त्याने टी-२०मध्ये कसा खेळ करावा हे आपल्या फलंदाजीने आणि यष्ट्यांमागील चपळतेने दाखवून दिलेले आहे. त्यामुळे हा छोटेखानी प्रकार भारतात झटपट परिचयाचा झाला, असे सबा म्हणाला.

एकेकाळी जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळख जातो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९० सामने खेळलेले असून २३ अर्धशतकांसह ४,३२२ धावा नोंदविलेल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनीही धोनी हा संघाच्या रणनीतील महत्त्वाचा भाग असून तो २०२२पर्यंत सीएसकेसाठी खेळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.
आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)चे सुरुवातीपासून नेतृत्व करीत असून त्याने आपल्या कुशल नेतृत्वाखाली संघाला तीन जेतेपदे आणि पाच उपविजेतेपदे मिळवून दिलेली आहेत. सीएसके १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३व्या पर्वांत आपला शुभारंभी सामना पहिल्याच दिवशी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.