चला, कोरोनाबरोबर जगूया

0
327
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज, पणजी

संपूर्ण दिवस आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच चांगले गरम उकळलेलेच पाणी प्यावे.
चांगल्या आहाराबरोबर थोडासा व्यायाम, प्राणायाम, ओंकार साधना, योगासने करावीत व सर्वांत महत्त्वाचे शांत झोप घ्यावी. लवकर झोपावे – लवकर उठावे.
अशाप्रकारे वरील काही नियमांचे पालन प्रत्येकाने केल्यास कोरोनाबरोबरही आरोग्य प्राप्त होऊ शकेल.

संपूर्ण देशातून लॉकडाऊन उठले, राज्याच्या सीमा खुल्या केल्यात याचा अर्थ कोरोना गेला, असे मात्र नाही हं! हो, कोरोना आहे व पुढेही असणारच. असे कितीतरी साथीचे आजार आले व गेले, पण कायमचे नाही गेले तरी आपण त्या आजारांबरोबर राहतोच आहोत ना. गोवर, कांजिण्या, टी. बी. आहेच की.. असू दे ना… कोरोनाही असू द्या. फक्त गरज आहे ती मनाने खचून न जाता दिनचर्या, ऋतुचर्या, स्वस्थवृत्ताचे पालन करायचे. प्रत्येकाने स्वतःला थोडे नियम घालून घ्यायचे. भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्वजांनी काही संस्कार, नियम घातले आहे त्याची उजळणी करून त्यांचे पालन करायचे. सद्य परिस्थितीत कोरोनाच्या या महामारीत गरज आहे ती प्रत्येकाने स्वतःला बदलायचे. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या जे आपण आहारी गेलो आहोत, त्याचा त्याग करून भारतीय संस्कृतीकडे वळण्याची.
जगभरात कोरोना नक्की काय व कसा हे कोडे पडलेले असता व त्यावर शंभर टक्के यशस्वी औषधोपचार नसताना कुठलेच औषधी शास्त्र कोरोना बरा करण्याचा दावा करू शकत नाही. पण हो आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आहार-विहारादी उपक्रमांचे आचरण केल्यास कोरोना या विषाणूचा संसर्ग आपण टाळू शकतो. आजपर्यंत जे जे रुग्ण कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेले म्हणा किंवा कोरोना विषाणू बाधित रुग्ण म्हणा.. त्यांच्यामध्ये कमी-अधिक प्रमाणास खालील लक्षणे दिसतात. ही लक्षणे प्रत्येकाच्या बल, वय, स्थान, व्याधीक्षमता, इत्यादीनुसार कमी-अधिक प्रमाणात ० ते ४५ दिवसांपर्यंत व्यक्त होतात किंवा अव्यक्तच राहतात.

अगदी सुरुवातीला मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले तेव्हा खोकला, घशात खवखव, सर्दी व न्यूमोनिया अशी लक्षणे आढळली. जसजसे रुग्ण आढळत गेले तसतसे रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे स्पष्ट होत गेली.

  • अंगमर्द (अंगदुखी)
  • कफ (खोकला)
  • अनिसार
  • ज्वर (ताप)
  • डोकेदुखी
  • नाकातून स्राव येणे किंवा नाकावरोध, श्‍वास घेताना त्रास, मुद्दामहून श्‍वास घ्यावा लागणे
  • घशात खवखवणे
  • थकल्यासारखे होणे
  • थंडी वाजणे
  • चव न समजणे किंवा वास न येणे
    अशी लक्षणे असता योग्य चिकित्सा किंवा औषधोपचार न घेतल्यास हीच लक्षणे जास्त, व्यक्त होतात त्यामुळे श्‍वास घेताना त्रास होतो. आक्सिजनचे प्रमाण कमी होते. न्यूमोनिया, किडणी, लिव्हर फेल्युअरमध्ये जाऊ शकते. मानसिक आजार होऊ शकतो.
    वरील लक्षणे पाहता, आयुर्वेद शास्त्राप्रमाणे दोषांचा विचार करता कफ व वात दूषित होतो हे स्पष्ट होते. काही ज्वराची तर काही कास- श्‍वासाची लक्षणेही यात दिसतात. लक्षणांनुरुप पहिल्या आठवड्यात दोषांची आमावस्थाही स्पष्ट होते. म्हणून पहिल्या आठवड्यात पाचन औषधोपचार व दुसर्‍या आठवड्यात रुग्णाच्या व व्याधीच्या बलाचा विचार करून शोधनोपचार द्यावे. शोधनामध्ये मृदु रेचनाचा वापर होऊ शकतो. नस्य देऊ शकतो.

तसे पाहता कोविड-१९ वर कुठलेच औषध उपलब्ध नसल्याने, ह्या आजाराची चिकित्सा म्हणजे रुग्णामध्ये आढळणारी लक्षणाची चिकित्सा करणे होय. म्हणूनच प्रत्येक शास्त्र आपल्यापरीने मनुष्याचे व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी औषधी निर्मितीमध्ये लागले आहे.
अशा परिस्थितीत कोविड पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो किंवा इतर जनता… सर्वांनीच कोरोनाच्या महामारीत साधे नियम स्वतःला घालून या कोरोनाला हरवायचे आहे. योग्य आहार- विहाराने शरीर व मनाचे आरोग्य सांभाळावे.

  • सगळ्यात पहिला नियम म्हणजे सद्वृत्ताचे पालन करणे. यामध्ये शिंकताना, जांभई देताना, हसताना तोंडावर हात किंवा रुमाल धरावा म्हणजेच पूर्ण नाक व तोंड झाकेल असा मास्क वापरावा. कारण साथीचे आजार, जनोपध्वंस व्याधी श्‍वासातून, शिंकण्यातून जास्त पसरतात. घरात, आपल्या माणसांत मास्क जरी नाही वापरला तरी डिस्टेंसिंगचा नियम घरातही पाळावा.
  • मुलांनी व घरात इतर माणसांनीदेखील स्वच्छतेचे पालन करावे. हात, पाय, परत- परत साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • प्रत्येक वेळी बाहेरून घरात आल्यावर आंघोळ करावी. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा. प्रत्येक वेळी साबण नाही वापरला तरी चालेल, चण्याच्या डाळीचे पीठ, मसूर डाळीचे पीठ वापरले तरी हरकत नाही. पाणी गरम करताना निंबाची पाने पाण्यात टाकता आल्यास उत्तम.
  • एकमेकांचे कपडे वापरणे टाळावे. टॉवेल, हातरुमाल इत्यादी पण स्वतंत्र वापरावे.
  • एसीचा वापर टाळावा.
  • सहयोजनात – एकत्र येऊन वाढदिवस, सण, पार्ट्या, समारंभ टाळावे.
  • रोज सकाळ-संध्याकाळ घरात धूपन करावे, धूपनात गुग्गुळ, वचा, लसुणाच्या साली, कांद्याच्या साली, कडुनिंबाची पाने, देवदार चूर्ण इत्यादी वापरावे.
  • गंडूष व कवल ग्रहण करावे. गंडूषासाठी त्रिफळा चूर्णाचा काढा किंवा हळदपूड व मीठ पाण्यात मिसळून गुळण्या करणे. तीळ तेल तोंडात धरून ठेवणे. घशात खवखवणे, दुखणे, कफ चिकटल्या सारखे वाटणे अशी लक्षणे गुळण्या केल्याने कमी होता.
  • नाकपुड्यांमध्ये जुने तूप, तीळ तेलाचे थेंब टाकावे. मुलांच्या नाकपुडीत हाताचे बोट तेलात बुडवून फिरवले तरीही चालेल.
  • मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना सतत त्यांच्या आवडत्या क्रियांमध्ये गुंतवून ठेवावे. टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवावे. स्तोत्रे, मंत्र पाठांतर करून घ्यावे.
  • व्याधीक्षमत्व वाढविण्यासाठी च्यवनप्राश सेवन, हळद घालून दूध सेवन. अश्‍वगंधा, गुडूची, आमलकी, पिप्पलीसारख्या औषधी द्रव्यांचा वापर करावा. औषधी द्रव्ये ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी.
    आहार हा पचायला हलका असणारा, सात्त्विक व सकस असावा. तेलकट, चमचमीत, मसालेदार, मांसाहार टाळावा. सर्दी, तापांसारखी लक्षणे दिसू लागताच तर्पणासाठी लाजामण्ड (लाह्याचे पाणी) घ्यावे. पेज घ्यावी. मुगाचे कढण घ्यावे. रोजच्या जेवणात वरण- भात, तूप, लिंबाचे लोणचे, भाज्यामध्ये कारली, पडवळ, घोसाळी, दोडका, तोंडलीसारख्या भाज्या वापराव्या. पालेभाज्यांपेक्षा फळभाज्यांवर भर द्यावा, म्हणजे त्या जास्त दिवस टिकतात व बाजारात सारखे भाज्या आणायला जावे लागत नाही. आमटीसाठी मूग, मसूर, मटकी, कुळीथ यांचा वापर करावा. फळांमध्ये डाळिंब, तोरींग, द्राक्षे, लिंबू सारखी फळे वापरावीत. आवळ्याचे लोणचे, आवळा मुरब्बा, आवळ्याचे सरबत, आवळा सुपारी सेवन करावी. तसेच ह्या आहाराबरोबरच सर्वांनाच लागणारे पेय म्हणजे चहा. चहाची जेव्हा जेव्हा लहर येईल तेव्हा तेव्हा तुळशीची ४ पाने, दालचिनीचा एक तुकडा, पाव चमचा सुंठ, दोन मिरी दाणे, एक कप पाण्यात घालून मस्त चहा सारखा उकळून चहाच्या कपात घालून प्यावा. ह्याने चहा पिण्याचे समाधान होईल व ही सर्व द्रव्ये प्राणवह स्त्रोतसांवर कार्य करणारी व व्याधीक्षमत्व वाढविणारी द्रव्ये आहेत. त्यांचे रोज सेवन करावे.
    संपूर्ण दिवस आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच चांगले गरम उकळलेलेच पाणी प्यावे.

चांगल्या आहाराबरोबर थोडासा व्यायाम, प्राणायाम, ओंकार साधना, योगासने करावीत व सर्वांत महत्त्वाचे शांत झोप घ्यावी. लवकर झोपावे – लवकर उठावे.
अशाप्रकारे वरील काही नियमांचे पालन प्रत्येकाने केल्यास कोरोनाबरोबरही आरोग्य प्राप्त होऊ शकेल.