कळंगुट येथील बाजारातील ‘कळंगुट सुपर मार्केट’च्या शटरचे टाळे तोडून शुक्रवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू मिळून अंदाजे सहा लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली.
कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुपर मार्केटचे मालक दिगंबर सांगोडकर शुक्रवारी रात्री १० वा. आपले मार्केट बंद करून गेले. काल सकाळी मार्केट उघडण्यासाठी आले असता शटर उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कळंगुट पोलिसांना पाचारण करण्यात आले. सांगोडकर आपल्या मार्केटात एका छोट्याशा खोलीत दागिने बनविण्याचे काम करतात. त्यामुळे एका लहान कॅबिनेटमध्ये त्यांनी सोन्याच्या वस्तू आणि दागिने ठेवले होते. चोरट्यांनी मार्केटमध्ये प्रवेश करून सर्व दागिने चोरून नेल्याची तक्रार सांगोडकर यांनी पोलिसात केली आहे. त्याचप्रमाणे सुपर मार्केटमधील किराणा मालही लंपास केला. मार्केटमध्ये घुसल्यानंतर चोरट्यांनी रोकड शोधण्याचा प्रयत्न करताना सामानाची नासधूसही केली. मालकाने एकूण सात लाख रुपयांचा माल लंपास केल्याचा दावा सांगोडकर यांनी तक्रारीत केला आहे. कळंगुट पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक संतोष देसाई अधिक तपास करीत आहेत. हल्ली आस्थापने लवकर बंद करण्यात येत आहेत. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाजारात संशयितांवर पाळत ठेवली आहे.