रोमिंग फ्री… मैत्र जीवांचं!

0
111

भ्रमिष्ट

फुलं तोडून, त्यांचा कलात्मक गुच्छ बनवून तो जर फुलदाणीत (फ्लॉवर पॉट) ठेवला तर एक-दोन दिवसात कोमेजतो. पाण्यात ठेवला नि वरून फवारा मारला तरीही.. कारण पोषण करायला मुळंच नसतात. समाजातील बंधुभाव, एकोपा.. सहिष्णुता ही अशी मूळं मातृभूमीशी.. मातृभाषेशी.. इथल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडलेली असली पाहिजे.

प्रीतिसंगम. शब्दच किती कर्णमधुर वाटतो नाही! त्या गावाचं ते वैशिष्ट्य होतं. दोन नद्यांचा संगम. समोरासमोरून वाहत येत जिवलग मैत्रिणींसारख्या एकमेकीला गळामिठी घालत एकरूप होऊन एकच सरिताप्रवाह वाहू लागतो ते रम्य स्थान. दोन्ही नद्यांच्या पाण्याचा रंग लक्षात येईल इतका वेगळा.. एकीचा पांढरट तर दुसरीचा तांबडसर पण किती असोशीनं एकमेकात मिसळतात नि एकजीव होऊन वाहू लागतात.
ते गाव तसं ना खेडं ना शहर असं नगर होतं. सांस्कृतिक समरसतेसाठी प्रसिद्ध होतं. मशिदींचे उंच मिनार इथं मंदिरांच्या उत्तुंग कळसांशी अद्वैत साधून होते. विशेषतः पहाटेच्या व सांजवेळेच्या संधिप्रकाशात न्हाऊन निघताना तर त्यांच्यातलं संवादी प्रेम ओसंडून जायचं. फार स्वच्छ रस्त्यांचा व त्याहूनही निर्मल मनांच्या लोकांचं नगर होतं ते. आज परिकथेतलं वाटावं असं.
तर नदीच्या काठानं, अनवाणी पायानं मनसोक्त फिरल्यावर बसायचं ठरवलं. काठापासून जवळच असलेल्या झाडीत असलेल्या खडकांना सपाट करून बसण्यासाठी बाक तयार केले होते. आजुबाजूच्या निसर्गाशी एकरूप होऊन त्याचा आस्वाद घेण्यासाठी ही कल्पकता खूप भावली. एका बाकाच्या टोकाला बसलो. सूर्य मावळत होता. आल्हाददायक किरणांचा पिसारा हळुहळू आवरून घेत होता. सकाळी उघडलेल्या त्या सोनेरी वैभवाची घडी घालताना तो लोभस दिसत होता.
मन निरीक्षण करत होतं. बुद्धी त्याचा अर्थ लावत होती. एक प्रकारची देहाच्या पलीकडची तंद्री लागली होती. इतक्यात मागून आवाज आला, ‘काका, आम्ही इथं बसू?’ वळून पाहिलं तर एक बोलक्या डोळ्यांची युवती व प्रवाही चेहर्‍याचा युवक उभे होते. सौजन्यानं उठून म्हटलं, ‘अवश्य बसा. मी बसतो दुसरीकडे. कबाब में …’ माझं वाक्य अर्धवट तोडत तो तरुण उद्गारला, ‘.. हड्डी नाही काका! उलट आमच्या दोघांच्या स्लाइसमधला जॅम आहात तुम्ही!’ मी गंमतीनं म्हणालो, ‘जाम झालोय मात्र हल्ली.’ ती हसत बोलली. ‘तो जाम नाही काका, जॅम.. फ्रुट जॅम’ .. ‘म्हणजे थोडक्यात माझं सँडविच करणार तर तुम्ही!’ तिघंही आतून हसलो.
पहिल्याच भेटीत अनोळखी व्यक्तीशी युगायुगांचं किंवा जन्माजन्माचं मैत्र असल्यासारखं बोलणं हा माझा छंद… अनुभवानं सांगतो बर्‍याच वेळा त्याला प्रतिसादही तसाच मिळतो… उन्मुक्त.. उत्स्फूर्त.. मुक्त छंदासारखा! त्या दिवशी असंच घडलं. ते दोघे माझ्या बाजूला नाही तर समोरच्या खडकावर बसले. दोघांच्या हातात वह्या होत्या. गंमतीनं म्हटलं, ‘मुलाखत – बिलाखत घेणार की काय माझी?’
यावर अमित (तो युवक) म्हणाला, ‘काका, मुलाखत नाही, बिलाखत घेणार आहोत.’ माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्‍नचिन्ह पाहून स्वरा (अर्थातच ती युवती) उद्गारली, ‘म्हणजे काका, गप्पा मारणार आहोत तुमच्याशी.’ .. त्यानंतर गप्पांचा टप्पा सुरू झाला.
ते दोघे कॉलेजचे विद्यार्थी होते. राज्यशास्त्र व समाजशास्त्र हे त्यांचे विषय होते. त्यांना एक प्रकल्प (प्रोजेक्टर) सादर करायचा होता. त्यासाठी मुलाखती घेत होते.
‘आमच्या सरांनी किनई दोन गट केलेयत. चाळिशीच्या खालच्या तरुणांचा नि चाळिशीच्या वरच्या प्रौढांचा. त्यांच्या प्रकल्प-गटात ते चौघे होते. दुसर्‍या दोघांनी युवागट निवडला. त्यांनी मोठ्या उमेदीनं प्रौढ-वृद्ध मंडळींचा गट निवडला होता. ‘असं का?’ विचारल्यावर अमित-स्वरा एका स्वरात उद्गारले, ‘युवकांकडे आकांक्षा व स्वप्नं असतात, पण ज्येष्ठांकडे असतात स्मृति नि अनुभव!’ मी म्हटलं, ‘अरे वा, काय राघूमैनेसारखं बोलताय. पाठ केलंय का हे सारं?’ – ‘नाही काका, पाठ झालं. तसं पाहिलं तर आमच्या प्रबंधातलं ते मध्यवर्ती सूत्र आहे.’ .. दोघंही मराठी माध्यमातून शिकत होते. साहित्य हा त्यांचा विषय नसला तरी मायबोलीतला साधा हुंकारदेखील ‘वाङ्‌मय-ॐकार’ ठरतो, हा अनुभव येत होता. … ‘काका, आम्ही पाच मिनिटं तुमच्यामागे उभे होतो, तुम्हाला त्याची जाणीवच नव्हती. एवढं कोणतं निरीक्षण करत होता?’ या प्रश्‍नावर मी आत वळून म्हणालो, ‘काही नाही, आकाशातले ढग, त्यांचे आकार – रंग; उडत किलबिलणारे पक्षी; हवेत शहारून थरथरत असलेली झाडंझुडपं, दूर दिसणार्‍या दोन नद्या, समोरून त्यांचा वाहणारा प्रवाह, काठावर स्नान करणारी, व्यायाम करणारी, संथ फिरणारी निरनिराळ्या वयाची – वर्णाची माणसं… हे पाहात असताना ते सारं मिळून एक जिवंत दृश्य – एक जीवन चित्र कसं निर्माण होतं त्याचा आनंददायी अनुभव घेत होतो. खरं तर सर्व इंद्रियातून पीत होतो मी ते आनंदामृत!’
‘‘कित्ती छान काका, आमचा हाच विषय आहे… ‘विविधतेतील जिवंत एकात्मता’.. जरा आणखी सांगा ना’’… या त्यांच्या आर्जवी आज्ञेनुसार एक चित्र उभं केलं जे खरं जीवन चित्रच होतं.
‘असं पहा.. निसर्गात विविधता (बायोडायव्हर्सिटी) असते तर मानवी समाजात असते अनेकता (व्हरायटी)… पण दोन्हीच्या तळामुळाशी असते एकता (युनिटी) नि त्याच्याही आतली एकात्मता (इंटेग्रिटी). पण हे सारं सृष्टीशी संवाद साधणारं हवं. उदाहरण म्हणून एक फुलांची बाग घ्या. विविध रंगांची – गंधांची – आकारांची फुलं तिथं खुललेली उमललेली असतात. पण प्रत्येक फुलात चैतन्य असतं, झाडाच्या मुळापासून आलेलं. पण तीच फुलं तोडून, त्यांचा कलात्मक गुच्छ बनवून तो जर फुलदाणीत (फ्लॉवर पॉट) ठेवला तर एक-दोन दिवसात कोमेजतो. पाण्यात ठेवला नि वरून फवारा मारला तरीही.. कारण पोषण करायला मुळंच नसतात. समाजातील बंधुभाव, एकोपा.. सहिष्णुता ही अशी मूळं मातृभूमीशी.. मातृभाषेशी.. इथल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडलेली असली पाहिजे. तिला इथल्या पर्यावरणाचा गंध, परिसराचा स्पर्श हवा… अशा एकात्मतेची नाळ जोडलेली असते जननी – जन्मभूमीशी .. सृष्टिमातेशी..’ यानंतरही बराच संवाद आम्हा तिघांत घडला. आमच्यात जडलेल्या मैत्राला साक्षी होते ते खडक-पक्षी-नदी-आकाश नि चैतन्य…सर्व आसमंतात भरून राहिलेलं नि चराचराला भारून टाकणारं! हे चिरंतन चैतन्य आम्ही मूक राहून अनुभवत होतो. प्रत्यक्ष जगत होतो… अमित-स्वराचे हात हातात घेऊन.. पाठीवर थोपटत दृष्टीनं शुभेच्छा देत तिथून निघालो.