Home बातम्या बिबटा पुन्हा सक्रीय

बिबटा पुन्हा सक्रीय

0

बाराजण-सत्तरीतही बिबट्याचा वावर

वाळपई-बाराजण खोतोडा सत्तरी येथे बिबट्याचा संचार वाढला असून त्या भागातील शेतकर्‍यांच्या अनेक गायी, कुत्रे बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत.

बाराजण सत्तरी येथील शेतकरी गोकुळदास विठोबा नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याच्या गोठ्यातील एका गायीला पळविण्याचा तसेच वासराला जखमी करण्याची घटना घडली आहे. तसेच एक वासरू गायब असल्याचे गोकुळदास याने सांगितले.

बाराजण येथील बागायतदार दुभाषी यांनी आपल्या बागायतीत पट्टेरी वाघ पाहिल्याची माहिती दिली. बिबटा रात्री तसेच दिवसाही नागरिकांच्या नजरेस पडत आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले. तो बिबटा रात्रीचा लोकवस्तीत घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना चिंता लागून राहिली आहे. त्या बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने सापळा लावला आहे.

वडावल येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

वडावल-लाटंबार्से येथे बिबट्या वाघाने एका वासराला ठार केल्याच्या घटनेने या परिसरात घबराट पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून काही कुत्रेही गायब झाले आहेत.

नाईकवाडा वडावल येथील मनोहर गणेश नाईक यांच्या मालकीच्या १३ महिन्याच्या जर्सी गाईचे वासरावर बिबट्याने आदल्या दिवशी हल्ला केला होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा येऊन तो वासराला घेऊन गेला. या प्रकाराचा पंचनामा वन अधिकार्‍यांनी प्राणिमित्र अमृतसिंग यांच्या उपस्थितीत केला.