दाबोळी विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसापासून विमानांना पक्ष्यांची धडक बसण्याचे प्रकार सुरू असून आज तिसर्या घटनेची नोंद करताना कुवेतहून गोवा मार्गे चेन्नईला जाणार्या एअर इंडियाच्या एअर बस ३२३ विमानाच्या पंख्यामध्ये उतरणीच्या वेळी पक्षी धडकल्याने विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवून दुरुस्ती करुन नंतर चेन्नईला रवाना झाले.
एअर इंडियाचे ए. आय. ९७६ क्रमांकाचे एअर बस ३२३ हे विमान १२३ प्रवसी व ६ कर्मचार्यांसह सकाळी ७.४५ वाजता दाबोळी विमानतळ क्षेत्रामध्ये येत असतानाच विमानाच्या पंख्यामध्ये पक्षी सापडल्याचे एअर ट्राफीक कंट्रोल केंद्राला समजले. लगेच त्याने विमानाच्या यायलटला याची माहिती देऊन दक्षता घेण्यास सांगितले. लगेच विमान धावपट्टीवर आल्याबरोबर बाजूला करुन सर्व प्रवाशांना सुखरूपपणे उतरविण्यात आले. नंतर पंख्याची दुरुस्ती करून सकाळी ८.२० मिनिटांनी चेन्नईला जाणारे विमान दुपारी ११.०५ वाजता रवाना झाले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी ऍमस्टरडॅमहून गोवामार्गे कोलंबोला जाण्याच्या तयारीत असताना दाबोळी विमानतळावर पंख्यामध्ये पक्षी अडकल्याने दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले ‘आर्क फ्लाय’ कंपनीचे विमान काल सकाळी येथून रवाना झाले.