Home बातम्या ‘टीम अण्णा’ बरखास्तीचा प्रश्नच नाही : केजरीवाल

‘टीम अण्णा’ बरखास्तीचा प्रश्नच नाही : केजरीवाल

0

आपल्या आंदोलनाची संचालन समिती बरखास्त केली जाणार नाही अशी घोषणा अण्णा हजारे यांच्या सहकार्‍यांच्या वतीने काल करण्यात आली. जर जनलोकपाल विधेयक आगामी संसद अधिवेशनात संमत केले गेले नाही, तर कॉंग्रेसविरुद्ध पुढील निवडणुकांत प्रचार केला जाईल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अण्णा हजारे व सहकार्‍यांची संचालन समिती बरखास्त करण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार संचालन समितीवर जे आरोप करीत आहे, त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही जनलोकपाल विधेयकापासून अन्यत्र लक्ष विचलित करण्याचे सरकारचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही, असे अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले.

काल टीम अण्णाची पाच तास बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की कॉंग्रेस पक्ष जनलोकपाल विधेयकाच्या समर्थनार्थ पुढे न आल्यानेच हिस्सारमध्ये त्यांच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला गेला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात केजरीवाल म्हणाले की, हे पत्र आधी आले असते तर कॉंग्रेसविरुद्ध प्रचार करण्याची वेळच आली नसती. पंतप्रधानांनी हे पत्र १० ऑक्टोबरला पाठविले.

संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक संमत केले गेले नाही तर मात्र कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याची मोहीम पाच राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांवेळी राबवावी लागेल असा इशारा केजरीवाल यांनी दिला.