अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री कोंडोलिना राइस यांचा गौप्यस्फोट
सन २००१ मध्ये भारतीय संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर भारताने आपल्या पश्चिम सीमेवर अण्वस्त्रे सज्ज ठेवली होती आणि पाकिस्तानशी चर्चा करण्याचा अमेरिकेचा दबाव धुडकावला होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या वरिष्ठ मुत्सद्दी कोंडोलिना राइस यांनी केला आहे. राइस यांनी आपल्या कारकिर्दीच्या आठवणी लिहिल्या असून त्यांचे ‘नो हायर ऑनर’ हे पुस्तक पुढील आठवड्यात प्रसिद्ध होत आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
डिसेंबर २००१ मध्ये दक्षिण आशियातील घटनाक्रमांबाबत पेंटागॉन आणि सीआयएदरम्यान मतभेद निर्माण झाले होते, अशी माहितीही कोंडोलिना राइस यांनी दिली आहे. भारत पाकिस्तानशी युद्धाची तयारी करीत आहे अशी माहिती सीआयएने व्हाईट हाऊसला पुरवली होती, परंतु पेंटागॉन मात्र त्याच्याशी सहमत नव्हती. राइस या स्वतः तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर होत्या.
सीआयए ही त्यावेळी जवळजवळ पाकिस्तानची भाषाच बोलत होती आणि जगाने त्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करीत होती, असे राइस यांनी म्हटले आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला असल्याने युद्धाला तोंड फुटू शकते अशी अटकळही सीआयएने व्यक्त केली होती, परंतु सीआयएचे स्त्रोत मुख्यतः पाकिस्तानी होते, असेही राइस यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे संरक्षण खाते तेव्हा संरक्षण गुप्तचर विभागाच्या माहितीवर विसंबून होते व त्यांच्याकडून आलेल्या माहितीचे विश्लेषण करीत होते. त्यांना भारताने उचललेली पावले म्हणजे अशा स्थितीत कोणत्याही लष्कराकडून उचलली जातील अशाच स्वरूपाची पावले होती व त्यातून युद्धाला तोंड फुटेलच असे नव्हे असे वाटत होते, असेही राइस यांनी लिहिले आहे.