>> पर्यटन खात्याच्या आकस्मिक तपासणीत प्रकार उघड
पर्यटन खात्याने राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्सच्या केलेल्या आकस्मिक तपासणीमध्ये गोवा शॅक धोरणाचे 99 शॅकचालकांनी उल्लंघन केल्याचे उघडकीस आले असून, त्यात शॅक भाडेपट्टीवर देण्याचा प्रकरणांचा समावेश आहे. शॅक धोरणाचे उल्लंघन केलेल्या सर्व व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल दिली.
हरमल समुद्रकिनाऱ्यावर अमर बांदेकर या स्थानिक तरुणाचा एका शॅकमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पर्यटन खात्याला जाग आली आहे. पर्यटन खात्याकडून समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी भाडेपट्टीवर दिले जातात; मात्र काही जणांकडून हे शॅक भाडेपट्टीवर परप्रांतीय किंवा इतरांना दिले जात असल्याचे पर्यटन खात्याने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आले आहे.
उत्तर गोव्यातील 80 आणि दक्षिण गोव्यातील 19 शॅकचालकांनी शॅक धोरणाचे उल्लंघन केले आहे. पर्यटन खात्याने शॅक धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईसाठी प्रयत्न सुरू केले आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या शॅकचालकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.