मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट; आंबावली-केपे येथे 15वा प्रेरणा दिन संपन्न
न्य पक्षांनी केवळ आश्वासने दिली; मात्र भाजपनेच या समाजाला न्याय्य हक्क दिले. त्यात स्व. अटल बिहारी वाजपेयी आणि स्व. मानोहर पर्रीकर यांचे मोलाचे योगदान राहिले. भाजप सरकार राज्यातील आदिवासींच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे 2027 च्या विधानसभा निवडणुकीत या समाजाला राजकीय आरक्षण मिळवून दिले जाईल. एवढेच नव्हे, तर येत्या डिसेंबरपर्यंत वन हक्क कायद्याखाली 100 टक्के लोकांना सनदा दिल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. आंबावली-केपे येथे आयोजित 15 व्या प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आदिवासी कल्याण संचालनालय आणि युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) या संघटनेतर्फे स्व. मंगेश गावकर आणि स्व. दिलीप वेळीप यांच्या स्मरणार्थ आंबावली-केपे येथील ईडन इको गार्डनमध्ये प्रेरणा दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर सभापती गणेश गावकर, आदिवासी कल्याणमंत्री डॉ. रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप, गोवा एससी एसटी आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गावकर, वासुदेव गावकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक नीलेश धायमोडकर, टीआरआयचे संचालक प्रीतीदास गावकर, गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, गोविंद शिरोडकर उपस्थित होते.
‘माझे घर’ योजनेचा अधिकाधिक आदिवासींना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. वरील योजनेखाली त्यांची घरे नियमित करण्याचे कामही हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आदिवासींची संस्कृती, इतिहास व परंपरा याचे जतन करण्यासाठी फोंडा येथे एक भव्य असे ‘आदिवासी वस्तुसंग्रहालय’ उभारण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या रिक्त सरकारी पदांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा आदिवासी समाजातील युवा वर्गाला होणार आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य व पायाभूत सुविधा याचा आदिवासींना लाभ मिळवून देण्यात येणार आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.
समाजाच्या हितासाठी आणि भूमिपुत्रांच्या समस्या सेोडविण्यासाठी आपापसांतील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून समाजातील सर्व नेते मंडळी एकत्र आली आहे. राजकीय आरक्षण नसलेले गोवा हे एकमेव राज्य असून, त्यासाठी एकसंघ राहून लढा द्यायला हवा, असे मंत्री रमेश तवडकर म्हणाले.
चार मान्यवरांना प्रज्ञावंत पुरस्कार
यावेळी आदिवासी समाजातील डॉ. मधू घोडकिरेकर, शशिकांत गावकर, धाकू मडकईकर आणि रोनाल्डो गोन्साल्वीस या चार कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार’ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कल्याणकारी योजनांचा शुभारंभ
आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही कल्याणकारी योजनांचा शुभारंभ केला. त्यात धरती आबा सुविधा केंद्र, वन हक्क कायदा ॲटलास, सुधारित अटल आसरा गृह बांधणी योजना, व्हिजन डॉक्युमेंट 2037 आराखडा, आदिवासी पाक कला अशा योजनांचा समावेश होता. तसेच वनहक्क कायद्याखाली प्राथमिक स्वरूपात आदिवासी लोकांना सनदांचे वितरण मुख्यमंत्र्यांनी केले.
सत्ता मस्तकात जाण्यासारखे काम करता कामा नये, खुर्चीची शान वाढवायला हवी. वाटमारी करणाऱ्यांना धडा शिकवितानााा संघटित राहून शिक्षणाला महत्व द्या, स्वाभिमानाने जगा, असा सल्ला आमदार गोविंद गावडे यांनी यावेळी समाजबांधवांना दिला.