पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीचहून अधिक रुपयांनी वाढ
पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढ होणार नाही, असा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर काल पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. मागील 11 दिवसांतील ही चौथी इंधन दरवाढ असून, इंधनाचे दर 7 रुपयांनी वाढले आहेत. काल पेट्रोलची किंमत 2 रुपये 61 पैसे प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 2 रुपये 71 पैसे प्रति लिटर इतकी वाढली. नव्या दरवाढीनंतर गोव्यात पेट्रोलचा 103.92 रुपये, तर डिझेलचा दर 95.80 असा आहे. दरम्यान,
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गेल्या 11 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे 3 रुपयाने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी पेट्रोल 87 पैसे, तर डिझेल 91 पैशांनी महागले होते. आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7 रुपये 35 पैसे तर आणि डिझेल प्रति लिटर 7 रुपये 53 पैशांनी महाग झाले आहे. चौथ्यांदा इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढणार आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन उन्हाळ्यात लागलेल्या या महागाईच्या झटक्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
जनतेचा खिशावर दरोडा : राहुल गांधी
इंधन दरवाढीवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. निवडणुकीत मोठी आश्वासने द्यायची आणि नंतर जनतेच्या खिशावर दरोडा टाकायचा, एवढेच काम पंतप्रधान करत आहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘महागाई मानव’असा करत, भाजप सरकार निवडणुका संपताच पद्धतशीरपणे जनतेची लूट करत असल्याचा आरोप केला.