17 कोटींची अफरातफर करणाऱ्या संशयितास डेहराडूनमध्ये अटक

0
19

>> पर्वरी पोलिसांची यशस्वी कामगिरी

सुकूर येथील एका बांधकाम कंपनीत काम करणाऱ्या संशयिताला कंपनीत सुमारे 17 कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली.

निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकूर जोसवाडा येथील अदिती कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद दासरी यांनी दि. 28 डिसेंबर रोजी त्यांच्या कंपनीत काम करणारी व्यक्ती अशोककुमार मौर्य (43, गोरखपूर,उत्तर प्रदेश) याने कंपनीत सुमारे 17 कोटी रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवली होती. या तक्रारीत अशोककुमार याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे आर्थिक व्यवहार, कंपनीच्या खात्यातून नियमित स्टक ट्रेडिंग, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अशी कामे सोपवण्यात आली होती. याचा गैरफायदा घेऊन अशोककुमार याने ही अफरातफर केली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दि. 30 डिसेंबर रोजी अधिकृत तक्रार नोंदवल्यानंतर अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब, हवालदार भिकाजी परब आणि नितेश गावडे यांना उत्तराखंड येथील डेहराडून येथे पाठवण्यात आले आणि संशयित अशोककुमार यास तेथे ताब्यात घेतले. या प्रकरणात तांत्रिक आणि इतर माहितीनुसार तपास करून संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

अधिक माहिती मिळवली असता संशयित आरोपी अशोककुमार कंपनीला लुटण्याच्या इराद्याने अदिती कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करीत होता असे समजते. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला पाच दिवसांच्या रिमांडवर पाठवले असून उपनिरीक्षक मंदार परब पुढील तपास करीत आहेत.