५५ बसेस लवकरच कदंबच्या ताफ्यात

0
121

कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाच्या ताफ्यात नवीन ५५ बसगाड्या येत्या दीड ते दोन महिन्यात रूजू होणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परेरा नेटो यांनी गुरूवारी दिली. महामंडळाकडे सध्या ५०७ प्रवासी बसगाड्या आहेत.
नव्याने दाखल होणार्‍या २० बसगाड्या आंतरराज्य प्रवासी मार्गावर चालविण्यात येणार आहेत. आंतरराज्य प्रवासी मार्गावर चालविण्यासाठी दोन स्लिपर कोच आणि दोन लक्झरी गाड्या बांधण्यात येत आहेत. नवीन ३५ बसागड्या स्थानिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहे. नवीन बसगाड्या बांधण्याचे काम जोरात सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

कदंब महामंडळाचे राज्यात २७ हजार नियमित पासधारक आहेत. प्रवाशांना नियमित व चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. पासधारकांना स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. या स्मार्ट कार्डमुळे पासचे नूतनीकरण करण्याचे काम जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्डसाठी डेटा अद्यायवत करण्याचे काम सुरू आहे. हा डेटा अपडेट झाल्यानंतर स्मार्ट कार्डाचा वापर केला जाणार आहे. स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाल्यानंतर पासधारकाला एसएमएसच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे, असेही नेटो यांनी सांगितले.
महामंडळाचा महसूल वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. वास्को, पणजी, म्हापसा, मडगाव येथे नवीन अद्ययावत बसस्थानके उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वास्को येथील बसस्थानकाचे काम जोरात सुरू आहे. महसूल वाढवून महामंडळाला आर्थिक दृष्ट्‌या सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या १५ ऑगस्ट २०१७ पासून बायो गॅस, इथोनोलवर तीन बसगाड्या प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येत आहेत. या बसगाड्यावर कदंब मंडळाने केवळ कंडक्टरची नियुक्ती केलेली आहे. या तीन बसगाड्या खासगी कंपनीकडून चालविल्या जात आहेत. या प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या बससेवेचा दीड ते दोन महिन्यांनंतर आढावा घेतला जाणार आहे. ग्रीन बसगाड्याचे व्यवस्थापन खर्चिक आहे. प्रदूषण नियमंत्रणासाठी ग्रीन बसेस चालविण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास कदंब महामंडळाकडून सरकारच्या माध्यमातून ग्रीन बसेस खरेदी केल्या जाऊ शकतात, असेही नेटो यांनी सांगितले.