Home बातम्या ३ लाखांच्या लाच प्रकरणी ८६ वर्षीय सुखराम यांना पाच वर्षांचा कारावास

३ लाखांच्या लाच प्रकरणी ८६ वर्षीय सुखराम यांना पाच वर्षांचा कारावास

0

न्यायालयाबाहेर युवकानेही बदडले

एका खासगी कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी १९९६ साली तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी धरण्यात आलेले माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना दिल्ली न्यायालयाने काल पाच वर्षांच्या कारावासाची सजा फर्मावली. सध्या सुखराम ८६ वर्षांचे असून आपल्या वयामुळे आपल्याला शिक्षा करू नये अशी विनंती त्यांच्या वतीने न्यायालयास करण्यात आली होती, परंतु सीबीआयने सुखराम यांनी वारंवार तशा प्रकारचा गुन्हा केलेला असून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला.

सुखराम यांना शिक्षा फर्मावली जाताच न्यायालयाबाहेर एका तरुणाने त्यांच्यावर आकस्मिक हल्ला चढवला. हरविंदर सिंग नामक सदर युवकाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून पी. व्ही. नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दूरसंचार मंत्री असलेल्या सुखराम यांनी तीस कोटी रुपयांचे एक कंत्राट आपल्या मर्जीतील एका खासगी कंपनीला दिल्याचा आरोप असून न्यायालयाने तो ग्राह्य धरला आहे. साडे तीन लाख कंडक्टर किलोमीटर पॉलिथिन इन्स्युलेटेड जेली फिल्ड केबलचा पुरवठा करण्यासाठी हरियाना टेलिकॉम लि. या कंपनीला सुखराम यांनी हे कंत्राट बहाल केले होते.

‘‘आपण ८६ वर्षांचे असून गेली बारा – तेरा वर्षे न्यायालयीन सुनावणीस हजर राहात आलो आहोत. आपल्या पत्नीचे निधन झाले असून वृद्धापकालाच्या व्याधींनी त्रस्त आहोत’’ असा युक्तिवाद सुखराम यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. ‘‘आपण लाच घेतली असली तरी सरकारी तिजोरीला त्याचा काही फटका बसलेला नाही’’ असेही न्यायालयास सांगण्यात आले.