Home बातम्या म्हापसा येथे दुकान फोडून चार लाखांचे मोबाईल चोरीस

म्हापसा येथे दुकान फोडून चार लाखांचे मोबाईल चोरीस

0

तळीवाडा-म्हापसा येथील सेंट जेरॉम इमारतीच्या तळमजल्यावर असलेले विला नोवा लोबो यांचे आर्टे दोवरो डिजीटल वर्ल्ड हे दुकान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत वृत्त असे आज सकाळी ६.३० च्या सुमारास दुकानासमोर उभी केलेली आपली मोटारसायकल नेण्यासाठी आलेला मोबाईल दुकानातील कामगार आर्य दिव यास दुकानाचे शटर अर्ध्या स्थितीत असल्याचे नजरेस पडले. त्याने समोर जाऊन पाहिले असता शटरच्या डाव्या बाजूचे कुलूप व कुलूप लावण्यासाठी असलेल्या हूक एक्स ब्लेडच्या सहाय्याने कापल्याचे नजरेस पडले. आर्यन याने दुकान मालक विला नोवा लोबो यांना घटनेची माहिती दिली व म्हापसा पोलिसांना पाचारण करण्यात आले.

अज्ञात चोरट्यांनी शटरचे एका बाजूचे हूक कापल्यानंतर दुसर्‍या बाजूचे हूक कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, हूक कापण्यास बराच वेळ जात असल्याचे पाहून शटर खालच्या बाजूने वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील दुरुस्तीसाठी देण्यात आलेली १ लाख रुपयांचे ५० मोबाईल, दोन एसरचे लॅपटॉप, दुकानातील खणात ठेवण्यात आलेले एक लाख २० हजार रोख रक्कम, एक २३ हजार रुपयांचा एच.टी.सी. मोबाईल, १० हजार रुपयांची १०० चार जीबी मेमरी कार्ड व एक २५०० रुपयांचे १६ जीबी मेमरी कार्ड मिळून सुमारे ४ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मोबाईल, मोबाईलच्या वस्तू आणि रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. या दुकानात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कॅमेरा नादुरुस्त झाल्यामुळे दुरुस्तीसाठी देण्यात आला असल्याची माहिती दुकानमालक लोबो यांनी दिली. जर सीसी टीव्ही नादुरुस्त झाला नसता तर चोरट्यांचा ठावठिकाणा लावण्यास पोलिसांना यश आले असते. घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक विश्‍वजित चोडणकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कळंगुटकर, सुशांत चोपडेकर व तुषार यांनी केला. म्हापसा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत. चोरीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी श्‍वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या दुकानात एक तिजोरी होती व तिजोरीत सर्व प्रकारचे नवीन मोबाईल मिळून ५० लाखांचा माल होता. तिजोरी चोरट्यांना खोलता न आल्याने मोठी चोरीची घटना टळली.