२-० आघाडीसह भारताची दमदार सुरुवात

0
122

>> डेव्हिस कप : एकेरीचे पहिले दोन्ही सामने जिंकले

रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी एकेरीचे दोन्ही सामने जिंकत कझाकस्तानच्या नूर-सुल्तान येथे तटस्थ ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या पाकिस्तानविरुद्ध बहुचर्चित डेव्हिस चषक स्पर्धेतील लढतीत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारत आतापर्यंत डेव्हिस चषकात अपराजित राहिलेला आहे.

एकेरीतील दोन्ही सामने एकतर्फी राहिले. पहिल्या एकेरीत रामकुमार रामनाथनने १७ वर्षीय प्रतिस्पर्धी पाकी खेळाडू मोहम्मद शोएबचा केवळ ४२ मिनिटांत ६-०, ६-० असा फडशा पाडला. रामकुमारच्या बॅकहँड-फोरहँड फटक्यांपुढे शोएबचे काहीही चालू शकले नाही. दुसर्‍या एकेरीतही सुमित नागलने प्रतिस्पर्धी हुफैजा मोहम्मद रहमानला सहज परास्त केले. सुमितने ही लढत ६४ मिनिटांत ६-०, ६-२ अशी जिंकत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. आता आज होणार्‍या दुहेरीच्या लढतीत भारताचा अनुभवी व ज्येष्ठ टेनिस स्टार लियांडर पेस युवा जीवन नेदुचेझियनच्या साथीत कोर्टवर भारताला ३-० अशा विजयासह पुढील फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी उतरणार आहे.

त्यांची लढत हुफैजा व शोएबशी होणार आहे. दुहेरीतील विजयाबरोबरच पेस डेव्हिस चषकातील सर्वांत जास्त विजय मिळविण्याच्या संख्येत आणखी वाढ करणार आहे. आतापर्यंत पेसने ४३ विजय मिळवित विक्रम प्रस्तापित केलेला आहे. पाकिस्तानविरुद्धची ही लढत जिंकत भारत पुढील वर्षी ६-७ मार्च रोजी क्रोएशियाविरुद्ध वर्ल्ड क्वॉलिफायरमध्ये पात्रता मिळणार आहे.