डेल्टीन कारावेला कॅसिनो वेरेला स्थलांतरित करण्याचा आदेश

0
125

>> मांडवीतील तीन जहाजे वेरेला नेणार

मांडवी नदीतील डेल्टीन कारावेला हे कॅसिनो जहाज वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मांडवीतील सहा कॅसिनो जहाजांपैकी तीन कॅसिनो जहाजे पणजी आणि तीन कॅसिनो जहाजे वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी काल दिली.

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मांडवी नदीतील कॅसिनो स्थलांतरित करण्यासाठी जोर धरल्यानंतर नदीतील कॅसिनो जहाजासाठी नवीन जागांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. मांडवी नदीत डेल्टीन ग्रुपची तीन कॅसिनो जहाजे कार्यरत आहेत. त्यातील एक कॅसिनो जहाज स्थलांतरित करण्यासाठी बंदर कप्तान खात्याकडे अर्ज करण्यात आला आहे. मांडवी नदीतील डेल्टीन कारावेला हे कॅसिनो जहाज वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्याचा आदेश जारी करण्यात आला असून कारावेला हे कॅसिनो जहाज डेल्टीन रॉयलच्या मागील बाजूला उभे केले जाणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री लोबो यांनी दिली.

मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे आग्वाद बेच्या बाजूला स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच कळंगुट, साळगाव मतदारसंघातील काही ठिकाणी कॅसिनोसाठी जागेची पाहणी केली जात आहे.

पणजी महानगरपालिकेने कॅसिनो जहाजांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर पणजीत तीन कॅसिनो वेरेच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.