२४ लाखांच्या नव्या नोटा कळंगुटमध्ये जप्त

0
91

वरावाडा, कळंगुट येथे मंगळवारी मध्यरात्री एका कारमधून तीन व्यक्तींकडून २४ लाख रुपयांच्या दोन हचार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी कार व तिघा संशयितांना रंगेहात पकडण्यात आले असून मुख्य सूत्रधार फरारी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी काल दिली. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे शामसुंदर पालयेकर (४५) खोर्ली – म्हापसा, सुशांत वळवईकर (३०) बोरी – फोंडा व इशांत कोरगावकर (३०) काणका – पर्रा अशी आहेत.

कळंगुटचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना गावरावाडा, कळंगुट येथे एका हॉटेलजवळ एका कारमधून लाखो रुपये काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली. यानंतर ते सहकार्‍यांसोबत सदर हॉटेलजवळ दबा धरून बसले असता जीए-०५-डी-३९६३ क्रमांकाची स्विफ्ट कार घेऊन तिघे कोणाची तरी वाट पाहत असलेले दिसले. संशयावरून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची १२ बंडले असलेली एक पिशवी सापडली, ज्यात २४ लाखांच्या नव्या नोटा होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रक्कम व कारही जप्त केली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांनी जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेतल्याचा कयास आहे. ४० टक्के दलाली घेऊन काळा पैसा पांढरा करणार्‍या टोळीचे हे सदस्य असावेत असा संशय
पोलिसांना आहे. अजूनपर्यंत त्यांनी मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले नाही. मात्र, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दळवी यांनी सांगितले.