काटशह

0
85

प्रतिहल्ला हा सर्वोत्तम बचाव’ या अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. मगोने शह देण्याचा प्रयत्न चालवल्यावर दोन्ही ढवळीकर बंधूंची मंत्रिमंडळातून गच्छंती करून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल मगोला काटशह दिला. भाजपा एवढ्या आक्रमकपणे हे पाऊल उचलील अशी अपेक्षा मगोला नव्हती, कारण ती असती, तर दोघांनी आधीच स्वतःहून मंत्रिपद सोडले असते. ‘‘स्वाभिमान असेल तर सरकारातून बाहेर पडा’’ असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी स्पष्टपणे सुनावूनही त्यांनी तसे केले नव्हते. दीपक यांनी कार्यालयातून गाशा गुंडाळला होता तेवढाच. भाजपाला या घडीला आपली साथ हवी आहे आणि त्यासाठी आपण म्हणू त्या सौदेबाजीस तो तयार होईल अशा भ्रमात राहिलेल्या मगोपुढे नमते घेण्यापेक्षा आक्रमक होण्याचा राजकीयदृष्ट्या काहीसा जिकिरीचा पर्याय भाजपाने स्वीकारला आणि गेल्या पावणे पाच वर्षांच्या युतीवर स्वतःहून तुळशीपत्र ठेवले. जिकीरीचा असे म्हणण्याचे कारण या नव्या घडामोडीमुळे गोव्याच्या राजकीय रिंगणात भाजपा आता एकाकी पडेल. दोन्ही ढवळीकर बंधूंची मंत्रिपदे काढली गेली, तरी युतीचे दोर पक्षाने अजूनही पूर्णतः कापून टाकलेले नाहीत. ‘युतीसाठी अजूनही आमची दारे खुली आहेत’ असे सांगत भाजपाने आपले दार किलकिले ठेवलेले आहे, परंतु अपमानाचा वचपा मात्र पुरेपूर काढला गेला आहे. राजकीयदृष्ट्या एकाकी झुंज किती हिताची आणि किती धोक्याची ह्यापेक्षा स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेल्या आणि राज्यात बर्‍यापैकी बळकट संघटन असलेल्या आपल्या पक्षाची मगो नेत्यांनी सतत चालवलेली मानहानी कुठवर सोसायची हा विचार भाजपा नेतृत्वाने केला आणि त्यानुसार ढवळीकर बंधूंना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला गेला. हे केले नसते तर पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याची भीती होती. आता पुढे काय हा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. मगो पक्ष आजवर त्याला साद घालत आलेल्या गोवा सुरक्षा मंचाचा फायदा उठवणार की आपला आधीचा साथीदार असलेल्या कॉंग्रेसच्या गोटात शिरून नव्या राजकीय समीकरणांची जुळवणी करणार याबाबत आता प्रतीक्षा करावी लागेल. माध्यम प्रश्नावरील भूमिका, राजभाषेसंबंधीची भूमिका हे सगळे गुंडाळून ठेवले जाऊ शकते. स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने मगोला पडू लागली आहेत आणि २२ मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार तयार आहेत असा त्यांचा दावा आहे. मात्र, तेवढी संघटनात्मक आणि आर्थिक बांधणी मगोपाशी आहे का हा प्रश्न आहेच. परंतु सुदिन ढवळीकर यांना ‘किंगमेकर’ राहण्यापेक्षा स्वतःच ‘किंग’ बनण्यात स्वारस्य निर्माण झालेले असल्याने त्या दृष्टीने त्यांनी सावध पावले टाकायला सुरूवात केली आहे. भाजपाने मात्र त्यांना अनपेक्षित असलेला प्रतिसाद देऊन झटका दिला. दोघांची मंत्रिमंडळातून गच्छंती म्हणजे मगोने चालवलेल्या सौदेबाजीला विराम देण्यासारखे आहे. आता गोव्यातील राजकीय घडामोडी गतिमान होतील. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या ढवळीकरांच्या साथीने भाजपा विरोधकांची एकत्र मोट बांधण्यासाठी काही नव्या समिकरणांना जन्म दिला जाऊ शकतो. भाजपाला आजवर साथ देत आलेल्या दोघा अपक्षांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्नही होईल. दुसरीकडे, भाजपानेही आक्रमक धोरण स्वीकारले आहे. २६ + चे स्वप्न पाहात मगोची स्वप्ने धुळीला मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त भाजपा करील. मगोला नेत्रपल्लवी करणार्‍या पांडुरंग मडकईकरांना भाजपाने आधीच गळाला लावले आहे. मावीन गुदिन्हो भाजपाच्या वाटेवर आहेत. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी बेरजेचे राजकारण भाजपा मांडू शकतो. राजकारण हे अनिश्‍चिततेचे क्षेत्र आहे. दिवसागणिक त्याची गणिते बदलतात हे मात्र विसरून चालणार नाही!