२०२०मध्ये अमली पदार्थांची केवळ १४८ प्रकरणे

0
183

>> मागील तीन वर्षांत कमी संख्या, विधासभेत लेखी उत्तरात माहिती

राज्यात मागील तीन वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अमली पदार्थाच्या कमी प्रकरणाची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त प्रकरणाची नोंद झाली होती. तर, वर्ष २०२० मध्ये केवळ १४८ प्रकरणाची नोंद झाली असून या प्रकरणी एकूण १७२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात ५५ गोमंतकीय, ८१ परराज्यातील आणि ३६ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

राज्य विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गुन्हे, चोरी, अमलीपदार्थ यांच्यावर आधारित प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राज्यात वर्ष २०१७ मध्ये अमली पदार्थांच्या १६८ प्रकरणांची नोंद करून १९० जणांना अटक करण्यात आली. त्यात ६३ गोमंतकीय, ८८ परराज्यातील आणि ३९ विदेशी नागरिकांचा समावेश होता.
वर्ष २०१८ मध्ये २२२ प्रकरणांची नोंद करून २३६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात ७४ गोमंतकीय, ११२ परराज्यातील आणि ५० विदेशी नागरिकांचा समावेश होता.

वर्ष २०१९ मध्ये २१९ प्रकरणांची नोंद करून २४४ जणांना अटक करण्यात आली. त्यात ७६ गोमंतकीय, १०८ परराज्यातील आणि ६० विदेशी नागरिकांचा समावेश होता. राज्यात वर्ष २०१८ पासून अमली पदार्थांचे जादा सेवन केल्याने मृत्यूच्या एकाही प्रकरणाची नोंद झालेली नाही. २०१७ ते २०२० या काळात अमली पदार्थ प्रकरणांतील १०० प्रकरणे पोलिसांकडे प्रलंबित आहेत. त्यात २०२० मधील ९६ प्रकरणांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली. वर्ष २०२० मध्ये दरोड्याची दोन प्रकरणे आणि चोरीच्या ३९५ प्रकरणांची नोंद झाली. दोन्ही दरोडे आणि चोरीच्या २६१ प्रकरणाचा छडा लावण्यात यश प्राप्त झाले आहे.