१८ वर्षांखालील मुलांवरील लशींच्या चाचण्या पूर्णत्वाकडे

0
87

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरू असून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगात सुरू आहे. तसेच आता १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने काल दिल्ली उच्च न्यायालयाला दिली आहे. सध्या देशात १८ वर्षांखालील मुलांवर लशीच्या सुरू असलेल्या चाचण्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

१८ वर्षांखालील मुलांवर सध्या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्या लवकरच पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल आणि या लसीकरण मोहिमेलाही लगेचच सुरुवात होईल असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले.

१२ ते १८ वयोगटातल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी याचिका एका १२ वर्षीय बालकाने आपल्या आईच्या माध्यमातून आणि एका ८ वर्षांच्या मुलाच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला अजून थोडा वेळ दिला असून पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला होणार असल्याचे आदेश दिले आहेत.