स्वागतम्

0
93

गोव्याचे नवे पूर्णकालीक राज्यपाल म्हणून श्रीधरन पिल्लई यांनी काल रीतसर पदभार स्वीकारला. गेले जवळजवळ अकरा महिने पूर्ण राज्यपालाविना अधांतरी असलेल्या गोव्याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का होईना, एक पूर्णकालीक राज्यपाल लाभला आहे. श्रीधरन पिल्लई हे मल्याळी साहित्यिकही आहेत आणि त्यांच्या नावे तब्बल १३५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे साहित्यिकापाशी अपेक्षित असणार्‍या संवेदनशीलतेने ते आपला हा राज्यपालपदाचा कारभार चालवतील, गोव्याच्या जनतेशी स्नेहाचे नाते जोडतील आणि पक्षीय भेदाभेद न करता आपल्या संवैधानिक कर्तव्यांना अनुसरून वागतील अशी अपेक्षा आहे.
गोव्यात आजवर नानापरीचे राज्यपाल येऊन गेले. काही गोमंतकीयांच्या कायमचे स्मरणात राहिले, तर बरेचसे त्यांचे पद जाताच विस्मरणातही गेले. अलीकडच्या काळातील स्मरणात राहिलेल्या राज्यपालांमध्ये जेकब, वांच्छू, मृदुला सिन्हा, सत्यपाल मलिक आदींची नावे घ्यावी लागतील. जमीर यांच्यासारखे राज्यपाल मात्र त्यांच्या पक्षपाती वागण्यामुळेही स्मरणात राहिले आहेत हा भाग वेगळा. परंतु जेकब यांनी विलक्षण राजकीय अस्थिरतेच्या वातावरणातील गोव्यामध्ये एकटा राज्यपालही विकास घडवू शकतो हे दाखवून दिले होते. वांच्छू यांची नियुक्ती खरी केंद्रातील कॉंग्रेसच्या सरकारने केली होती, परंतु गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांचे भाजप सरकार आले तेव्हा त्याच्याशी त्यांनी पूर्ण सहकार्य करून राज्यपालास अपेक्षित असलेल्या निष्पक्षतेचा आदर्श परिचय घडवला होता. मृदुला सिन्हा ह्याही एक साहित्यिक होत्या आणि त्यांनी गोव्याच्या साहित्य जगताशी आणि आम जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोपासण्याचा प्रयत्न केला. गोव्याच्या संस्कृतीशी एकरूप होण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. सत्यपाल मलिक यांची गोव्यातील राज्यपालपदाची कारकीर्द मुख्यमंत्र्यांशी झडलेल्या क्षणैक संघर्षामुळे अल्पजीवी ठरली खरी, परंतु आपल्या नावाप्रमाणेच सत्याचा आग्रह धरून आणि कोरोनाकाळात राज्य सरकारने केलेल्या ‘एरर ऑफ जजमेंट’ वर नेमकेपणाने आणि परखडपणे बोट ठेवून आपली अल्प कारकीर्दही संस्मरणीय करून ठेवली. त्यांच्या नंतर आलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना उत्तम, हजरजबाबी वक्तृत्वाची देणगी लाभली होती खरी, परंतु महाराष्ट्रात त्यांनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी बहुमत नसताना रातोरात त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा लाजीरवाणा प्रकार केला, त्यातून त्यांची प्रतिमा ढासळली होती. आता पिल्लई यांच्या रूपाने एक कोरी प्रतिमा असलेला नवा राज्यपाल गोव्याला लाभला आहे.
गोव्यात येण्यापूर्वी श्रीधरन हे मिझोरामचे राज्यपाल होते. दोन वर्षांपूर्वी मिझोराममध्ये भारतविरोधी कारवाया जोरात होत्या. अगदी प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालण्यापर्यंत तेथील काहींची मजल गेली होती. परंतु आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत पिल्लई यांनी तेथे सौहार्दाचे वातावरण निर्माण केले असे म्हणता येते. गोव्यामध्ये येण्यापूर्वी एका राष्ट्रीय दैनिकाला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘राज्यपालाने राजकारणात गुंतू नये, परंतु सामाजिक प्रश्नांवर त्याने सक्रिय असायला हवे’ असे आपले मतप्रतिपादन केले आहे. गोव्यात काल पदभार स्वीकारताच त्यांनी त्याचाच पुनरुच्चार केला. गोव्यातील समृद्धी, सामाजिक सलोखा, कायदेशीर समानता, पर्यटनक्षेत्र म्हणून असलेला नावलौकीक ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे त्यांनी गोव्याविषयीची आपल्या मनात प्रतिमा बनवलेली आहे. येणार्‍या काळात त्यांना गोवा अधिकाधिक समजेल अशी अपेक्षा आहे. येणारे दिवस निवडणुकांचे आहेत, त्यामुळे अर्थातच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. राज्यपालपदाची कसोटी पाहणारे प्रसंगही भविष्यात येऊ शकतात. लोकायुक्तांपुढील याचिकांपासून सभापतींपुढील अपात्रता याचिकांपर्यंत अनेक विषय राज्यपालांपर्यंत जेव्हा जातील तेव्हा त्यांची त्यावर काय भूमिका राहील हे दिसेलच. ज्या केरळमधून ते आले आहेत, तेथील विविध चर्च संस्थांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुसंवाद घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. सलोखापूर्ण व्यवहाराची हीच परंपरा ते गोव्यातही राबवतील आणि स्वतःविषयीचा विश्वास जनसमानसात निर्माण करतील यात शंका नाही. गोव्याला केवळ राजभवनावर सुखासीन ऐदी आयुष्य जगणारा आणि जनतेशी देणेघेणे नसलेला राज्यपाल नको आहे. जनतेमध्ये मिसळणारा, जनतेला आपलासा वाटणारा, तिच्या सुखदुःखाची अगत्याने काळजी घेणारा राज्यपाल म्हणून श्रीधरन पिल्लई आपल्या कार्यकाळात यशस्वी ठरतील अशी अपेक्षा करूया. गोमंतकीय जनतेच्या वतीने त्यांचे स्वागतम्!