१८ पर्यंत सरकार मागे न हटल्यास आंदोलन

0
120

>> मगो पक्षाचा मेळावली प्रकरणी इशारा

शेळ-मेळावली येथील भूमीपुत्रांना विस्थापित करून तेथे आयआयटी प्रकल्प उभा करण्याचा निर्णय जर गोवा सरकारने येत्या १८ जानेवारीपर्यंत मागे घेतला नाही तर मगो पक्ष भूमीपुत्रांसाठी राज्यस्तरावर आंदोलन सुरू करणार असल्याचे काल मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांना पाठवलेल्या व्हिडिओ संदेशाद्वारे स्पष्ट केले. शेळ-मेळावली प्रकरणी ‘गोकुवेध’ने जे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला मगो पक्ष पूर्ण पाठिंबा देणार असून त्यांच्या आंदोलनात सक्रिय भाग घेणार असल्याचा इशारा ढवळीकर यांनी दिला.
शेळ-मेळावली येथील भूमीपुत्र गेल्या कित्येक वर्षांपासून पिढीजात शेती व्यवसाय करीत आहेत. त्यांनी आपल्या गावात शेती करण्याबरोबरच तेथे बागायतीही वसवल्या आहेत. शेती नष्ट करून सरकार तेथे आयआयटी प्रकल्प उभारण्याचे स्वप्न का पाहत आहे, असा सवाल त्यांनी केला. फर्मागुढी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, तेथेच प्रकल्प बांधा असे ते म्हणाले.

सरकार चर्चेस तयार : मुख्यमंत्री
आयआयटी प्रकल्पाला विरोध करणार्‍या शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांसाठी राज्य सरकारने अजूनही चर्चेसाठीची द्वारे खुली ठेवलेली असून ज्यांना या प्रश्‍नी सरकारबरोबर चर्चा करायची असेल त्यांनी आपल्याशी चर्चा करण्यासाठी यावे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. जर त्यांना सरकारशी चर्चा करावी असे वाटल्यास त्यांनी यावे. आपली द्वारे त्यांच्यासाठी खुली आहेत असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.