१८ जून मार्गावर पादचार्‍यांसाठी विशेष लेन उभारण्याचा विचार

0
61

रस्त्यांवर पादचार्‍यांसाठी वेगळी विशेष लेन असल्याचे चित्र विदेशांत पहावयास मिळते. त्यामुळे रस्त्यांवरून पायी चालत जाण्याची एक वेगळी संस्कृती विकसित होत असल्याचे चित्र विदेशात पहावयास मिळत असून त्याच पध्दतीने पणजीतील १८ जून रस्त्यावर अशीच पादचार्‍यांसाठी एक वेगळी लेन तयार करण्याचा विचार असल्याचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.
एका बाजूने गाड्या पार्किंगसाठी जागा, त्याच्या बाजूने वाहनांसाठीची लेन व त्याच्या बाजूला पादचार्‍यांसाठीची लेन असे या रस्त्याचे स्वरूप असेल. हे प्रत्यक्षात उतरल्यानंतर १८ जून मार्गावरून चालत जाणार्‍या पादचार्‍यांचे लोंढेच पहावयास मिळणार असल्याचे ते म्हणाले. या प्रयोगामुळे गाड्यांचा कमी वापर, धुरामुळे होणारे वायू प्रदूषण कमी, तसेच चालत जाणार्‍या संस्कृती वाढ, तसेच पादचार्‍यांना एक प्रकारची प्रतिष्ठा व चालत जाणार्‍या लोकांना व्यायाम असे फायदेही या प्रयोगामुळे होणार असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले.
मिरामार-दोनापावल रस्त्याबाबत आज बैठक
मिरामार-दोनापावला या कॉंक्रिट रस्त्याचे सगळे काम पूर्ण झाल्याच्या व केवळ रस्त्याच्या बाजूला पथदीप बसवण्याचे तेवढे काम शिल्लक राहिल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी या कामाचा फेरआढावा घेण्यासाठी आज सकाळी (५ जुलै) पणजीत बैठक बोलावली आहे, अशी माहिती सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी काल दिली. येत्या १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापूर्वी सगळे काम पूर्ण व्हावे यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मिरामार-दोनापावला या पणजीतील पहिल्या कॉंक्रिट रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदपथासह, गटारे व रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेले असून रस्त्याच्या बाजूला पथदीप बसवण्याचे काम तेवढे शिल्लक राहिले आहे, असे कुंकळ्येकर यानी सांगितले. २०१४ सालापूर्वी सुरू झालेले हे काम होण्यास विलंब का झाला त्याची माहिती देताना ते म्हणाले की आयवांब येथील निवासी इमारतींना सांडपाण्याच्या जोडण्या देण्याची गरज होती. त्या कामामुळे रस्त्याचे काम हाती घेण्यास विलंब झाला. ७२ कोटी रु. खर्चुन बांधण्यात आलेला हा रस्ता पुढील ५० वर्षांपर्यंत वापरता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.