१८० पर्यटकांसह पहिले चार्टर विमान आले हो…

0
11

>> राज्यातील पर्यटन व्यावसायिक सुखावले; कझाकिस्तानमधून दर आठवड्याला येणार एक विमान

थोड्याशा विलंबाने का होईना; पण या मोसमातील पहिले चार्टर विमान काल दाबोळी विमानतळावर उतरले. कझाकिस्तान येथून आलेल्या या विमानातून १८० विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. या पर्यटन मोसमात आता कझाकिस्तान येथून दर आठवड्याला एक चार्टर विमान गोव्यात येणार असून, ते दाबोळी विमानतळावर उतरणार आहे.

चार्टर विमानांचे आगमन लांबल्यामुळे गोव्याच्या यंदाच्या पर्यटन हंगामास विलंबाने सुरुवात झाली. ११ ऑक्टोबर रोजी दाबोळीवर रशियाहून अझूर एअरलाईन्सचे चार्टर विमान विदेशी पर्यटकांना घेऊन येणार होते; मात्र काही कारणांमुळे ते रद्द करण्यात आले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी अलमाटी, कझाकिस्तान येथून स्केट एअरलाइन्सचे चार्टर विमान येणार होते; मात्र तेही रद्द करण्यात आले.

अखेर काल पहाटे ५.२१ मिनिटांनी पहिले चार्टर विमान १८० पर्यटक आणि ९ क्रू मेंबर्सना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरले. या विदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी विमानतळावर पहाटे खास उपस्थिती लावली आणि त्यांनी पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पर्यटकांच्या उपस्थितीत केक कापला. यावेळी दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव, पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
काल राज्यात पहिले चार्टर विमान उतरल्यानंतर मंत्री माविन गुदिन्हो यानी आनंद व्यक्त केला. दाबोळीत चार्टर विमान प्रवाशांना घेऊन उतरल्याने मला खूप आनंद झाला आहे. विमानतळावरील सर्वांच्या चेहर्‍यावरही स्मितहास्य उमटले आहे. गोवा हा आता एक मोठा ब्रँड बनला आहे आणि ते जगभरातील पर्यटकांचे एक आवडीचे पर्यटन स्थळ बनले असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

३ नोव्हेंबरपासून आठवड्याला
‘एरोफ्लोट’ची तीन विमाने येणार

येत्या ३ नोव्हेंबरपासून रशियाच्या एरोफ्लोट या कंपनीची आठवड्याला तीन चार्टर विमाने गोव्यात येणार आहेत. एरोफ्लोटच्या विमानातून प्रत्येकी २२८ प्रवाशी गोव्यात येणार आहेत. त्याशिवाय ब्रिटनमधूनही एक चार्टर विमान लवकरच गोव्यात येणार आहे.

१५० विदेशी चार्टर विमाने येणार

यंदाच्या पर्यटन हंगामात मॉस्को आणि कझाकिस्तान येथून १५० विदेशी चार्टर विमाने पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरणार आहेत. तसेच अन्य देशातूनही विदेशी चार्टर विमाने पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल होतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या पर्यटन हंगामासाठी विमानतळावर अंदाजे ३०० विमान उड्डाणे हाताळणे अपेक्षित आहे.