१५०० मीटरमध्ये जॉन्सनला सुवर्ण

0
104

भारतीय धावपटू जिन्सन जॉन्सन याने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत काल गुरुवारी सुवर्णपदकाची कमाई करताना स्वतःला इतिहासाचा भाग बनवले. त्याने ३.४४.७२ मिनिटे अशी वेळ नोंदविली. आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात तब्बल ५६ वर्षांनी भारताला प्रथम स्थान मिळाले आहे. १९६२ साली मोहिंदर सिंग यांनी भारताला गोल्ड जिंकून दिले होते. या प्रकारात महिला विभागात २००२ साली बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत सुनीता राणीने भारताला सुवर्ण मिळवून दिले होते.

केरळचा २७ वर्षीय जॉन्सनने स्वतःची शक्ती राखून ठेवताना शेवटचे ३०० मीटर अंतर असेपर्यंत सातत्याने तिसरे स्थान राखले. यानंतर वेग वाढवत त्याने आघाडीवरील खेळाडूंना अचंबित केले. ३.४६.५७ सेकंद अशा वेळेसह मनजीत सिंग चौथ्या स्थानी राहिला. इराणच्या आमिर मोरादी याने या मोसमातील आपली सर्वोत्तम वेळ नोंदवताना ३.४५.५२ सेकंद अशा वेळेसह रौप्य पदक मिळविले. बहारिनचा मोहम्मद तियोअली ३.४५.८८ सेकंदासह तिसर्‍या स्थानी राहिला. पात्रता फेरीत जॉन्सनने ३.४६.५० अशी वेळ नोंदवत तियोअलीच्या मागे दुसरे स्थान प्राप्त केले होते तर मनजीत ३.५०.५९ अशा वेळेसह सातव्या स्थानी राहिला होता.