१२ ते १४ वयोगटातील मुलेही होणार लसवंत

0
15

>> उद्यापासून देशभरात लसीकरण मोहिमेला प्रारंभ; कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस देणार

कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले असून, आता देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल या संदर्भात माहिती दिली. उद्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. या वर्षीच्या सुरुवातीला १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीजीसीआय) २१ फेब्रुवारीला बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कोरोनावरील लस ‘कोर्बेवॅक्स’ला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली होती. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुले सुरक्षित, तर देश सुरक्षित. मला सांगायला आनंद होतोय की, १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू होत आहे. तसेच ६० वर्षांवरील वृद्धांनाही बूस्टर डोस दिला जाईल.

६० वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार असल्याची घोषणा देखील काल केली. यापूर्वी ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिक, फ्रंटलाईन वर्कर यांनाच बुस्टर डोस दिला जात होता.

२००८ ते २०१० दरम्यान जन्म झाला असेल तर लस मिळणार
देशात ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा उघडणे सोपे झाले. आता १२ ते १४ वयोगटातील मुलांचेही लसीकरण होणार आहे. २००८, २००९ किंवा २०१० मध्ये जन्मलेल्या मुलांचे लसीकरण केले जाईल. देशातील १८ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल.