नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज

0
11

>> राज्यपालांकडून गणेश गावकर यांना हंगामी सभापती पदाची शपथ

राज्यातील आठव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन मंगळवार दि. १५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्याचा आदेश राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी जारी केला आहे. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे. दरम्यान, काल राज्यपालांनी गोवा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून गणेश गावकर यांना शपथ दिली.

दोनापावला येथे राजभवनात पार पडलेल्या हंगामी सभापती गणेश गावकर यांच्या शपथविधी समारंभाला काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, कायदा सचिव चोखा राम गर्ग, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व इतरांची उपस्थिती होती.

राज्यातील आठव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन मंगळवारी आयोजित करण्यात आले असून, हंगामी सभापती गणेश गावकर हे नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देणार आहेत.

विधानसभा संकुल परिसरात जमावबंदी आदेश जारी
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी गोवा विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी येथील विधानसभा संकुलाच्या ५०० मीटरचा परिसर आणि पणजी पोलीस स्थानकाच्या अखत्यारित परिसरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. १५ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून हा आदेश लागू होणार असून, विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत तो लागू राहणार आहे. या आदेशानुसार पाच जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मोर्चा, पदयात्रा व ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.