कोरोना बळी ३ हजाराच्या उंबरठ्यावर

0
112

>> राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ३ हजारांवर; नवे केवळ २१७ रुग्ण; ७ जणांचा बळी

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ०६६ एवढी झाली आहे, तर राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २,९९७ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात चोवीस तासांत ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये ५ रुग्ण, तर दक्षिण गोवा इस्पितळात २ रुग्णांचा बळी गेला आहे.

नव्या २१८ रुग्णांची नोंद
गेल्या २४ तासांत कमी प्रमाणात स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. केवळ २६७६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील २१८ नमुने बाधित आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत इस्पितळांमधून ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ६५४ एवढी झाली आहे.

फोंड्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
फोंडा येथे सर्वाधिक २४७ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मडगावातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १७९ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात १७२ रुग्ण, चिंबलमध्ये १४२ रुग्ण, कांदोळीत ११८ रुग्ण, कुठ्ठाळीत १२७ रुग्ण, पर्वरीत ११० रुग्ण, साखळीत १४० रुग्ण, कुडचडेत ९३ रुग्ण, वास्कोत १०० रुग्ण, शिरोडा येथे ९० रुग्ण, म्हापसा येथे १०६ रुग्ण, केपे येथे १०७ रुग्ण, काणकोण येथे १२२ रुग्ण आहेत.

नवे २८ रुग्ण इस्पितळांत दाखल
राज्यातील इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत केवळ नव्या २८ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.

४१३ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल आणखी ४१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार ५९१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १९० रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.

राज्यात पुरेसा प्राणवायू उपलब्ध

>> राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी आलेल्या अनुभवावरून ४० केएल प्राणवायूच्या बफर साठ्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा प्राणवायूचा बफर साठा तिसर्‍या लाटेसाठी पुरेसा आहे, तरीही तज्ज्ञ समितीला प्राणवायूच्या बफर साठ्याचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच आणखी आवश्यकता लागेल का हे निश्‍चित करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कोरोनाविषयक दाखल याचिकांवरील सुनावणीवेळी काल दिली.

केंद्र सरकारने मंजूर केलेला ४० केएल प्राणवायूचा बफर साठा अपुरा पडू शकतो, असा दावा याचिकादाराने केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची सूचना केली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या बळींचा वेगळा आढावा घेण्याची गरज नाही. राज्यात कोविड रुग्णांचे मृत्यू लपविण्यात आलेले नाहीत. काही खासगी इस्पितळांनी कोरोना रुग्णांची उशिरा नोंद केली आहे. त्यांच्याकडून आवश्यक दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. ज्या इस्पितळांनी कोरोना रुग्णांची उशिरा नोंद केली, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे, असेही पांगम यांनी सांगितले.