‘१०८’ रुग्णवाहिका कर्मचार्‍यांचे आजपासून बेमुदत उपोषण

0
108

राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा पुरवणार्‍या जीव्हीके फाउंडेशन या कंपनीने मोठा गैरव्यवहार सुरू केलेला आहे असा आरोप करून १८ रोजीपासून संपावर असलेल्या या रुग्णवाहिका कर्मचार्‍यांपैकी ६ कर्मचारी आज १९ रोजीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय या ६ कर्मचार्‍यांनी घेतला आहे, असे कामगार संघटनेचे सरचिटणीस सागर प्रभुदेसाई यांनी काल सांगितले.जीव्हीके फाउंडेशनने १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची वाहने पाठवली आहेत. मात्र, या गाड्यांची वेळोवेळी दुरुस्तीही करण्यात येत नाही. तसेच रुग्णवाहिकांसाठी जी औषधे पुरवण्यात येत असतात ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोपही संपावर असलेल्या कर्मचार्‍यांनी बोलताना केला. कित्येक रुग्णवाहिकांमधील वातानुकूलीत यंत्रणा चालत नसून आवश्यकतेपेक्षा रुग्णवाहिकांचा आंकडाही बराच कमी असल्याचे या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. सरकारकडे यासंबंधी तक्रार करूनही कंपनीवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर हे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.