लोककलांच्या देखण्या आविष्काराने ‘ऑक्टेव्ह ऽ गोवा’चे उद्घाटन

0
133

भारतातील उत्तर पूर्व राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द आहेत, परंतु इतर राज्यात त्याचे क्वचितच दर्शन घडते. अशा या राज्यांचे पारंपरिक, सांस्कृतिक वैभव आविष्कृत करणार्‍या ‘ऑक्टेव्ह ऽ गोवा’ या महोत्सवाला काल कला अकादमीच्या दर्या संगमावर उभारलेल्या शानदार आणि ग्रामीण संस्कृतीला पूरक अशा कलात्मक रंगमंचावर प्रारंभ झाला.पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व गोवा शासनाचे कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांच्या हस्ते काल थाटात उद्घाटन झाले. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर, कला संस्कृती सचिव फैजी ओ. हाश्मी, पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक फुर्खान खान, कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, कला संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर व उपसंचालक अशोक परब व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यपाल कल्याण सिंग यांनी पंचवीस वर्षांपूर्वी गोव्यात आलेल्या आठवणींना उजाळा देवून ते म्हणाले, कला हे संस्कृती आस्वादणे व पारखण्यासाठी सशक्त माध्यम आहे. अशा महोत्सवातून नृत्य, संगीत, खाण्या-पिण्याच्या पध्दती, वेशभूषा, साहित्य, जनजाती अशा विविध अंगानी संस्कृतीचे दर्शन घडते. कलेच्या माध्यमातून आपली संस्कृती एका धाग्यात बांधलेली आहे. पूर्वोत्तर राज्यांच्या समृध्द कलांचा वारसा सुदृढ करण्यासाठी केंद्र सरकार, राज्यसरकार व जनतेने अन्य प्रयत्नही करायला हवेत. शौर्य, कला, पर्यटन यासाठी जगप्रसिध्द असलेल्या गोव्यात हा महोत्सव होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दयानंद मांद्रेकर यांनी दुसर्‍यांच्या कलाविष्काराचे कौतुक करायला हवे, त्याने आपली कला कमी होत नसते तर ती वाढते असे सांगून गावातील लोककलांचे सादरीकरण अशा व्यासपीठावरून होत असल्याने त्या कला सर्वत्र पोचायला मदत होते असे ते म्हणाले.
लोक कलांचा देखणा आविष्कार
उद्घाटनानंतर उत्तर पूर्व राज्यातील लोककलांचा सुरेख आविष्कार घडविणार्‍या कार्यक्रमाचा आस्वाद घेणे हा वेगळा आनंदानुभव होता. अरुणाचल प्रदेशचे जुजू-झा-झा, आसामचे बिहू नृत्य, दहाल भुंगरी, मणिपूरचे घोल चोलम, थांगता, गा-लाम नृत्य, पुंग चोलम नृत्य, मेघालयाचे का शाद मस्तीहे नृत्य, बंगाल नृत्य, मिझोरमचे चेरॉ नृत्य, सोलाकिया नृत्य, नागालॅण्डचे मुंग्यांता नृत्य, नागा वॉर नृत्य, सिक्कीमचे सिंघी चाम नृत्य, तमंग सेलो, त्रिपूराचे होझागिरी नृत्य, संग्राय अशा लोकनृत्यांचा एकत्रित आविष्कार पद्मश्री बन्सी कौर यांनी कोरिओग्राफी (नृत्य संयोजन) केलेल्या कार्यक्रमातून घेतांना रसिक मंत्रमुग्ध झाले. उत्तरपूर्व राज्यातील लोकसंगीत, लोकवाद्ये, लोकनृत्य शैली, सौंदर्यपूर्ण वेशभूषा, वादन शैली, या सर्वांचा आगळा-वेगळा आविष्कार रसिकांना अनुभवता आला. २२ रोजीपर्यंत हा महोत्सव चालणार असून त्यात रोज सायंकाळी ७ वाजता लोककलांचे सादरीकरण असेल. शिवाय हस्तकला वस्तूंचे स्टॉल दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत खुले असतील.